Crime News: जेजुरी: साकुर्डे गावच्या हद्दीत एस टी बस मधून 5,60,000/- रु किं सोन्याचे दागिने लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): एस टी बस मधून पंढरपूरला कार्यक्रमासाठी जात असताना एसटी बस साकुर्डे गावच्या हद्दीतील हॉटेलसमोर जेवणासाठी थांबली असता महिलेच्या बॅगेत ठेवलेले तब्बल 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याबाबत फिर्यादी मनिषा बापुसाहेब पाटील (वय 51 वर्षे), व्यवसाय – गृहिणी, रा. देहू रोड, विकासनगर, ता. हवेली, जि. पुणे यांनी आरोपी अज्ञात चोरटा यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या आपली सून क्रांती हिच्यासोबत तिच्या बहिणीच्या ढवाळ जेवणासाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी २६ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास एसटी बसने निघाल्या होत्या. वल्लभनगर ते पंढरपूर जाणारी एमएच 14 एचजी 8491 क्रमांकाची एसटी बस दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास साकुर्डे गावच्या हद्दीत हॉटेल आईसाहेब समोर जेवणासाठी थांबली. यावेळी मनिषा पाटील व त्यांची सून चहा-पाण्यासाठी बसमधून खाली उतरल्या. त्यानंतर बसमध्ये ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 2 लाख 15 हजार रुपये किमतीचे 43 ग्रॅम वजनाचे काळे-पिवळे मणी व दोन वाट्या असलेले सोन्याचे गंठण आणि 95 हजार रुपये किमतीचा 19 ग्रॅम वजनाचा अर्धगोलाकार सोन्याचा नेकलेस यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पखाले हे करीत आहेत.



