आपला जिल्हा

News: गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात 27 विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने २७ विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १४ अन्वये याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

यंदा पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरुवात होणार असून २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात तसेच विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी होते. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ,मुळशी, शिरूर, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा आणि हवेली आदी तालुक्यांसह पुणे शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हे अधिकारी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियुक्त अधिकारी संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करतील. नियुक्त अधिकाऱ्यांपैकी एखादे पद रिक्त असल्यास संबंधित तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना नजीकच्या नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून अतिरिक्त कार्यभार देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button