क्राईम

Crime News : जेजुरीत दुकानाची तोडफोड करणारे आरोपी जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरीमध्ये दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये स्वप्नील जयेंद्र कांबळे (वय ३३ वर्षे), रा. दिघी पुणे, प्रणय राजू पाटोळे (वय २६ वर्षे), यश राजू पाटोळे (वय १९ वर्षे), रा. काळेवाडी पुणे, सुधीर बाळू पाटोळे (वय ३४ वर्षे) आणि सूरज बाळू पाटोळे (वय २५ वर्षे) रा. मरकळ पुणे यांचा समावेश आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी येथील गडाच्या पायथ्याशी असलेल्या नंदी चौकात महादेव वाघमारे यांचे भंडार-खोबरे व पेढे विक्रीचे दुकान आहे. ३१ जानेवारी २०२६ रोजी काही भाविक दुकानासमोर आले आणि त्यांनी तेथे आपल्या पायातील चपला ठेवण्याचा आग्रह धरला. यावेळी दुकानदार महादेव वाघमारे यांनी दुकानासमोर चपला ठेवू नका, ज्या ठिकाणी तुम्ही भंडार-खोबरे घेतले आहे तेथे चपला ठेवा असे सांगितले. या कारणावरून दुकानदार आणि भाविक यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी जमाव जमवून दुकानदार वाघमारे यांना दांडक्याने व हातापायाने मारहाण केली. तसेच दुकानातील भंडार-खोबरे व पेढे फेकून देत दुकानाची तोडफोड करून तेथून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच टीव्ही चॅनलवर व्हायरल झाल्याने परिसरात मोठी चर्चा आणि घबराट निर्माण झाली होती.

त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी फिर्यादी महादेव वाघमारे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओचा तपास करून संशयित आरोपींचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

सदरचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार नंदकुमार पिंगळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button