News: जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जिल्ह्यात युरिया खतांच्या तुटवड्याबाबत काही वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
हंगाम २०२५-२६ साठी जिल्ह्याला एकूण ७४,००० मेट्रिक टन युरिया खतांचे मंजूर वाटप करण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर ७०,२४९ मेट्रिक टन (९५ टक्के) पुरवठा झाला असून, मागील हंगामातील १३,३४७ मेट्रिक टन शिल्लक साठाही उपलब्ध आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामासाठी युरिया खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे.

तालुकानिहाय साठा व पुरवठ्याचा तपशील पाहता, आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हा या सर्व तालुक्यांमध्ये समाधानकारक प्रमाणात खत उपलब्ध आहे. काही तालुक्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पुरवठा पूर्ण झाला आहे.
शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करावे व अधिक साठा करून ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच, खतांच्या वितरणावर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून, कोणत्याही प्रकारचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



