News: जेजुरी: पुरंदर प्रीमियर क्रिकेट लीग: वासुकी बॉईजने उत्कृष्ट खेळी करत जिंकला मल्हार चषक

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत एस आर आर फाउंडेशन आयोजित पुरंदर प्रीमियर क्रिकेट लीगच्या स्पर्धेत महेश उबाळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वासुकी बॉईज जेजुरी संघाने ही स्पर्धा जिंकून मल्हार चषक जिंकला.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडाच्या पायथ्याशी व ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठी असलेल्या पालखी मैदानात एस आर आर क्रिकेट फाउंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी पुरंदर प्रीमियर लीग – मल्हार चषकाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत बारा संघ सहभागी झाले होते. पाच दिवसात दिवस रात्र पद्धतीचे
36 सामने खेळवले गेले. आयकॉन आणि आयडॉल खेळाडूंबरोबरच स्थानिक खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत क्रिकेट रसिकांची मने जिंकली.
या स्पर्धेत सर्वच सामन्यात उत्कृष्ट खेळी करत महेश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वासुकी बॉईज जेजुरी संघाने प्रथम क्रमांकाचा मल्हार चषक पटकाविला. या संघास रोख बक्षीस, चषक तसेच संघ मालकास दुचाकी गाडी देऊन सन्मानित करण्यात आले. नाथसाहेब कडेपठार एलेव्हन संघाने द्वितीय, प्रेम इलेव्हन हिवरे संघाने तृतीय , तर राजगड योद्धा जेजुरी संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. सर्व विजयी संघाना चषक व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

उत्कृष्ट फलंदाज निखिल चव्हाण – राहू , उत्कृष्ट गोलंदाज कमलेश राऊत जेजुरी, सामन्याचा मानकरी पुरस्कार अक्षय तावरे मोरगाव, व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चेतक गोरे सोलापूर यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. पंच म्हणून स्वप्नील काकडे, अक्षय चांदगुडे, तुषार मेटे, तर उत्कृष्ट समालोचन विजय साकोरे, संदीप ओव्हाळ, व सलीम यांनी काम पाहिले. या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. दररोज 75 हजारहून अधिक रसिकांनी ही लाईव्ह सामने पाहिले. तर हजारो क्रिकेट रसिकांनी मैदानावर हजेरी लावली होती. जेजुरी एस आर आर फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले होते.



