News: जेजुरी: सोमवती यात्रेनिमित्ताने लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या सोमवती यात्रा आणि दिवाळी सण या दुग्धशर्करा योगावर सोमवारी एक लाखांहून अधिक भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती. ‘सदानंदाचा येळकोट , येळकोट, येळकोट, जयमल्हार’…असा जयघोष करीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली. देवदर्शन, कऱ्हा स्नानाची पर्वणी तळीभंडार, जागरण गोंधळ आदी कुलधर्म कुलाचार पूजन उरकून अमावास्येची वारी पूर्ण केली.
सोमवारी (दि.९) सकाळी १२.३१ वाजेपर्यंतच अमावास्येचा पुण्यकाळ असल्याने पहाटे ५ वाजता मुख्य वतनदार इनामदार पेशवे यांनी आदेश देताच भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीत गडकोट आवारातून पालखी सोहळ्याने प्रस्थान केले. देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. दिवाळी सण असल्याने गडकोटाला करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि शोभेच्या फटाक्यांच्या अतिषबाजीने पहाटेच्या वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी विश्वस्त अड. विश्वास पाणसे, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, अड पाडुरंग थोरवे, अनिल सौदंडे, व्यवस्थापक आशिष बाठे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गंणेश आगलावे ,नित्य वारकरी व शहरातील अठरा पगड जातीधर्मातील मानकरी खांदेकरी, पुजारी, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .पालखी सोहळ्यापूढे घडशी समाजबांधवांचा सनईचा मंगलमय सूर, छत्र चामरे, अब्दागिरी, मानाचा अश्व, आदींच्या साथीने पालखीने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळा गडकोटाबाहेर पडला. यावेळी सज्जातील भाविकांनी सोहळ्यावर येळकोट येळकोट च्या जयघोष करीत भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण केली.

अवघड पायरी मार्ग उतरून नंदी चौकातून सोहळा मल्हार गौतमीश्वर मंदिरात पोहोचला. होळकरांचा मान स्वीकारून सोहळा मुख्य शहरातील ग्राम देवता जाणाई मंदिर मार्गे शिवाजी चौकातून धालेवाडीमार्गे कऱ्हा नदीतीराकडे मार्गस्थ झाला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कऱ्हा काठावर पोहोचला. खंडोबा – म्हाळसादेवी उत्सव मूर्तींना विधीवत अभिषेक घालण्यात आला. स्नान, धार्मिक विधी उरकल्यानंतर पालखी सोहळा धालेवाडी गावकर्यांचा मान स्वीकारून फुलाई माळीण कट्टा, जानाईदेवी कट्टा, येथे मान पान देत घेत दुपारी दोन वाजन्याच्या सुमारास पालखी सोहळा ग्रामदेवता जानाई मंदिरासमोर विसावला. संपूर्ण दिवसभर सोहळा भाविक, आणि ग्रामस्थांच्या दर्शनासाठी या ठिकाणी थांबून होता. रात्री ८ वाजता सोहळा गडकोटात दाखल झाला. रोजमुरा वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली.
जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील ,यांच्यासह १० पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० पोलीस कर्मचारी वर्ग बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता .देवसंस्थानच्या वतीने भाविक, खांदेकरी मानकरी यांचेसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार उपलब्ध करून दिला.



