Uncategorized

News: जेजुरी येथे गीत रामायण आणि श्रीराम गीतांचा सुरेल सांगीतिक सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक ०६.०४.२०१५ श्रीराम मंदिर, जेजुरी येथे प्रभू श्रीरामनवमीच्या पाश्वभूमीवर मंदिर समितीच्या वतीने “गीत रामायण आणि श्रीराम गीतांचा सुरेल सांगीतिक सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या संगीत सोहळ्यासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध गायिका संगीता कुलकर्णी – चौधरी यांना आमंत्रित करण्यात आले होते. संगीता चौधरी या गायनाबरोबरच गेली पंचवीस वर्षे देश विदेशातील विद्यार्थ्यांना शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगमसंगीत या प्रकारातील गायन कला शिकवितात. या संगीत सोहळ्याचा पारा खऱ्या अर्थाने वर चढत गेला तो संगीता चौधरी यांच्या सुमधुर स्वरांनी, त्यांना त्याच ताकदीने साथ दिली ती मनोमन अभिषेकी बुवांना आपले श्रद्धास्थान मानणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी. देशपांडे यांनी त्यांच्या गायनातून काही जागांवर त्याची अनुभूती रसिकांना नक्कीच दिली यात शंका नाही. अजय दाते यांनी देखील आपल्या गायकीचा एक वेगळा बाझ रसिकांसमोर पेश केला.

सहगायन आणि समूहगान गायकीचा भार मुग्धा रानडे आणि पौर्णिमा नवले यांनी अलगद वाहून नेला. या संगीत पर्वणीत संवादिनीहि गाऊ लागली ती जयंत साने यांच्या बोटांच्या जादूने आणि तबल्यावर अचूक आणि निर्विवाद थाप होती ती अशोक मोरे यांची. टाळ / चिपळ्यांची किनार अनुराधा चौधरी या विणत गेल्या तर निवेदनाची महत्वपूर्ण जबाबदारी हि भार्गवी ढवळीकरांनी लीलया पेलून त्यांनी खऱ्या अर्थाने कलाकारांना आणि रसिकांना जोडून ठेवलं. या सर्वांच्या या संगीत सेवेमुळे संपूर्ण मंदिर परिसर अगदी मंत्रमुग्ध झाला होता. जेजुरीतील रसिक प्रेक्षकांना हि यानिमित्ताने एक अलौकिक भेटच मिळाली. सर्वात महत्वाचं म्हणजे या संगीत सोहळ्यास श्रीरामांबरोबर वरुणराजानेही हजेरी लावली. या संगीत सोहळ्याचा शेवट हा मंदिरात श्रीरामांच्या सामूहिक आरतीने आणि प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने झाला. श्री मार्तंड देवसंस्थांचे माजी अध्यक्ष आणि जेजुरीकर श्रीराम मंदिर समितीचे सदानंद जेजुरीकर यांनी सर्व कलाकारांचे आभार व्यक्त केले आणि पुन्हा एकदा जेजुरीकर रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी पुढील श्रीरामनवमी करीता आमंत्रित केले.

दरम्यान जेजुरीकर श्रीराम मंदिर समितीच्या वतीने भाविकांना दिनांक ५ तारखेला होणाऱ्या “रामरक्षा – भक्ती, शक्ती आणि मुक्ती” या विषयावरील प्रज्ञाताई पंडित, ठाणे यांच्याद्वारे होणाऱ्या निरूपणास आणि दिनांक ६ तारखेला होणाऱ्या दिपकजी आगवणे यांच्याद्वारे होणाऱ्या “ प्रभू श्रीरामांचे अवतार कार्य” या विषयावरील व्याख्यानास तसेच “श्रीरामजन्मास” उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button