Crime News: अकस्मात मयत प्रकरणाचा उलगडा करून करणी केल्याचा संशय घेवून खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून खुनाचा गुन्हा उघडकीस

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राजगड पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजि. नं. ७५/२०२४ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे दि. २३/०९/२०२४ रोजी दाखल आहे. सदर प्रकरणात मयत नामे गणपत गेनवा खुटवड (वय ५२ वर्षे) रा. हातवे खु ा, ता. भोर, जि. पुणे यांचा मृतदेह हातवे बुगा गावाजवळील गुंजवणी नदीचे पुलाजवळ नदीपात्रात मिळाला व त्यांची मोटार सायकल पुलावर मिळून आली. याबाबत त्यांचे नातेवाईक संदिप अरूण खुटवड रा. हातवे खु।। यांनी राजगड पो. स्टे. येथे खबर नोंदविल्याने अकस्मात मयत प्रकरण दाखल करणेत आले.
सदरचे प्रकरणात मयताचे डोक्याला जखम होती, घटनास्थळाची पाहणी करता परिस्थिती प्रमाणे घटना संशयित असून सदरचा प्रकार हा खूनाचा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती, सदर बाबत पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शन घेवून त्यांचे सुचनांप्रमाणे स्था.गु.शा.चे पथकाने अकस्मात मयत प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करून मयत गणपत खुटवड यांचा दि. २२/०९/२०२४ रोजीचे दिनक्रमाची माहिती घेतली तसेच गावपातळीवर चौकशी केली असता, मयत व्यक्तीचे हातवे खु॥ गावातील स्वप्निल खुटवड याचे सोबत वादविवाद आहेत, अशी माहिती पथकाला मिळाली. मयत गणपत खुटवड हे दि. २२/०९/२०२४ रोजी हातवे खु॥ गावातून नसरापूर येथे गेले होते, त्याचे पाठोपाठ स्वप्निल खुटवड हा देखील नसरापूर येथे गेला होता. मयत गणपत खुटवड हे रात्री १०/३० वा सु ॥ स नसरापूर येथून हातवे गावाकडे जात असताना त्यांचा पाठलाग स्वप्निल खुटवड याने केला असल्याची माहिती पथकाला मिळाली.

बातमीचे आधारे स्था.गु.शा. चे पथकाने स्वप्निल खुटवड रा. हातवे खु। यास संपर्क करणेचा प्रयत्न केला असता, त्यास संपर्क झाला नाही. त्यामुळे त्याचेवरील संशय वाढल्याने बातमीदाराचे बातमीचे आधारे त्यास खेड शिवापूर परीसरातून ताब्यात घेवून त्याचे कडे चौकशी करणेत आली, प्रथम स्वप्निल खुटवड हा समाधानकारक उत्तरे देत नव्हता, परंतु त्यास स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत व राजगड पोस्टे चे पोनि राजेंद्र गवळी यांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता,” मयत गणपत खुटवड यांचे रेशनिंग दुकान आहे तसेच तो काळुबाई देवीचा देवऋषी असून तो करणी करतो व त्याने स्वप्निल खुटवड याला करणी केली आहे व त्यामुळे स्वप्निल खुटवड याचे रेशनिंग मिळण्याचे बंद झाले, व त्याची आर्थिक प्रगती होत नाही, असा गैरसमज झालेला असल्याने स्वप्निल खुटवड याचे मनात गणपत खुटवड यांचेबाबत राग होता. स्वप्निल खुटवड याने त्या गैरसमजातून रागाचे भरात गणपत खुटवड यांचा नसरापुर ते हातवे जाणारे रोडवर पाठलाग करून हातवे बु॥ गावाजवळील गुंजवणी नदीचे पुलाजवळ त्यांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांचे डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला व त्यांचा मृतदेह नदीपात्रात टाकून त्यांची मोटार सायकल पुलावर सुरक्षा कठड्यालगत अडकवून ठेवली जेणेकरून अपघात झाल्याचे वाटेल. अशी माहिती आरोपी स्वप्निल खुटवड याने सांगून त्याने खून केल्याचे निष्पन्न झाले.
स्वप्निल ज्ञानोबा खुटवड, (वय ३० वर्षे), रा. हातवे खु ा, ता. भोर, जि. पुणे यास राजगड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून त्याचेविरोधात राजगड पो स्टे गु.र.नं. ४५३/२०२४ भा. न्याय सं. क. १०३, ३५१(२), ३५१(३) प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. तानाजी बरडे, भोर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पो स्टे चे पो. नि. राजेंद्र गवळी, स्था.गु.शा.चे सपोनि दत्ताजी मोहिते, सपोनि कुलदीप संकपाळ, पो.स.ई. अभिजीत सावंत, अंमलदार अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजु मोमीण, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, राजगड पोस्टे चे पोसई अजित पाटील, अंमलदार जगदीश शिरसाठ, नाना मदने, अक्षय नलावडे यांनी केली असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.



