News: जेजुरी कडेपठारी ‘गणपूजा’ मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): तीर्थक्षेत्र जेजुरी कडेपठार श्री खंडोबा देवाचे मुळस्थान असणाऱ्या कडेपठार मंदिरात आषाढ शुद्ध प्रतिपदेला गणपूजेचा उत्सव हा उत्साहात आणि मोठ्या भक्तिभावाने साजरा केला गेला. भगवान श्री शंकर महादेव जगत्कल्याणासाठी श्री मार्तंड भैरव अवतारामध्ये कैलासावरून भूतलावर म्हणजेच जेजुरी येथील कडेपठारावर अवतरले तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. याच दिवशी देव गणांनी श्री मार्तंड भैरवाची भंडाऱ्याने पूजा केली तेव्हापासून हा दिवस ‘गणपूजा’ या नावाने ओळखला जातो.
या वर्षी अमावस्या समाप्ती आणि प्रतिपदा एकाच दिवशी म्हणजेच शनिवार दि. ०६.०७.२०२४ रोजी आल्याने अमावस्येनंतरची देवाची पाकाळनी आणि गणपूजा याच दिवशी संपन्न झाला.
मुख्य मंदिरामध्ये पाकळणीनंतर मानकऱ्यांच्या महापूजेला सुरुवात झाली. त्यामध्ये मुख्यत्वे मानाच्या पूजा पार पडल्या. रात्री रामोशी समाज (नाईक) याची मानाची नित्य पूजा झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी कडून मोठ्या प्रमाणात भंडार वाहिला गेला. स्वयंभू लिंगावर भंडाराच्या राशी लावल्या गेल्या. सुमारे तीन टन ते साडेतीन टन भंडाऱ्याने अगदी मार्तंड भैरवाच्या मूर्तीभोवती पर्यंत आणि संपूर्णं गाभारा व्यापून टाकला. भंडाऱ्याच्या राशींवर त्यावर विविधरंगी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. सदर आरास ही पुजारी वर्गातर्फे साकारण्यात आली.

साधारण रात्री ०१:०० वा. देवाची शेज आरती होऊन आरती मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना काढण्यात आला. सदर छबिना रात्रभर दिवटीच्या प्रकाशात व सनईच्या मंजुळ स्वरामध्ये अगदी पहाटेपर्यंत जागविण्यात आला. पहाटे छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवाचे अंगावरील भंडार प्रसादासाठी भाविकांचो एकाच झुंबड उडाली आणि भाविक मोठ्या भक्तिभावाने भंडार प्रसाद वर्षभराची शिदोरी घेऊन महाराजांचा निरोप घेतला.
श्री. खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या वतीने कडेपठार गडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती. त्याच प्रमाणे न्यासामार्फत दिवसभर भाविकांसाठी मोफत अन्नदानाचे नियोजन देखील केले होते, त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुसज्ज अशी दर्शनरांग दर्शन सुलभतेसाठी करण्यात आली होती. महाराष्ट्रातील असंख्य वाघ्या मुरुळी तसेच इतर स्थानिक कलाकार यांनी आप आपल्या परीने देवापुढे आपली कला सादर करून हजेरी लावली. देवस्थानच्यावतीने महाराष्ट्रभरातून तसेच इतर राज्यातून हजेरीसाठी आलेल्या वाघ्या मुरळीना सन्मानपत्र देण्यात आले.



