आपला जिल्हा

News: शासनाच्या ‘संवादवारी’ उपक्रमास वाल्हे येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : आषाढी वारीत राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘संवादवारी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथे आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आषाढ वारी सोबतच्या संवादवारी उपक्रमात शासनाच्या जवळपास सर्व विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची तसेच विकासकामांची माहिती फिरते चित्ररथ, एलईडी व्हॅन, कलापथक, पथनाट्य व प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येत आहे.

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘ राम कृष्ण हरी’ चा जयघोष करीत असंख्य वारकऱ्यांची पावले फिरते चित्ररथ, एलईडी व्हॅन व प्रदर्शनाकडे वळत होती आणि ते शासनाच्या विविध योजनांची माहिती घेत होते. लोककला पथकाच्या माध्यमातूनही ठिकठिकाणी भजन, विठुनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती देण्यात येत असल्याने या पथकाभोवतीदेखील गर्दी दिसून आली. विसाव्याच्या ठिकाणी वारकरी बांधवांचे मनोरंजन आणि दुसरीकडे विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या. त्यामुळे वारकऱ्यांच्यानी समाधान व्यक्त केले.

ज्ञानेश्वर गोविंद मर्ढेकर, मु.रिटकवली, ता. जावळी, जि. सातारा- ‘संवादवारी’ प्रदर्शनात विविध योजनांच्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. या माध्यमातून खूप लाभदायक माहिती मिळत आहे. यातील काही याजनांचा लाभही मी स्वतः घेत आहे. शासनाचा हा उपक्रम खूप चांगला आहे.

प्रकाश आनंदा पाटील, ता. करवीर, जि. कोल्हापूर- वाल्हे येथील संवादवारी प्रदर्शनातील सर्व योजनांची माहिती घेतली. शासन तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाचे स्तुत्य उपक्रम राबवित आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीच्या सरकारच्या योजना चांगल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button