आपला जिल्हाधार्मिक

News: जेजुरी सोमवती यात्रा उत्सव उत्साहात संपन्न; लाखो भाविकांची गर्दी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रा उत्सवाला यावर्षी लाखो भाविकांची अभूतपूर्व उपस्थिती लाभली. दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आलेल्या या पर्वणीमुळे संपूर्ण जेजुरी नगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाली. मध्यरात्री पालखी प्रस्थान, पहाटे कऱ्हा नदीवरील शाही मूर्तीस्नान आणि त्यानंतर नगरप्रदक्षिणा अशा त्रिकाळ दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतला.

राज्यासह देशाच्या विविध भागांतून भाविकांचे जेजुरीत आगमन सुरू झाले होते. सोमवती अमावस्येच्या पर्वकाळात मध्यरात्री देऊळ वाड्यातून खंडोबा पालखीला पारंपरिक पद्धतीने शेडा देण्यात आला. इनामदार, सरदार व पेशवे मानकऱ्यांच्या संकेतांनंतर रात्री दोन वाजता पालखीचे प्रस्थान झाले. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी कऱ्हा नदीकडे रवाना झाली.

पहाटे सूर्याच्या साक्षीने मार्तंड भैरवांच्या मूतींना कहानदी पात्रात विधिवत शाही स्नान घालण्यात आले. सदानंदाचा येळकोटच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. गुरव, पुजारी, वीर, कोळी व गडशी समाजाच्या पारंपरिक धार्मिक विधीनंतर ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी व सेवेकऱ्यांनी मानपानानुसार पालखीला खांदा देत आपली परंपरा जपली.

शाही स्नानानंतर पालखीचे नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान झाले. पायरी मार्गाने गडावर परतणाऱ्या य पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यंदा भेसळयुक्त भंडाऱ्यावर बंदी असल्याने केवळ शुद्ध भंडाऱ्याचीच उधळण करण्यात आली. प्रमाण कमी असले तरी शुद्ध भंडाऱ्याच्या वापरामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.

पालखी मार्गावरील रंभाउशी पिंपळ, फुलाई माळी, जाणाई मंदिर, होळकर वाडा, गोसावी मठ आणि छत्री मंदिर या ठिकाणी पालखी सोहळा काही काळ विसावला. मार्तंडदेव संस्थान ट्रस्ट, जेजुरी पोलीस प्रशासन, नगरपालिका तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या समन्वयातून हा सोमवती यात्रा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध, आनंददायी आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button