आपला जिल्हाकृषी

News: फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२६- २७ करिता द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, नारळ, संत्रा, अंजीर, आंबा व डाळिंब या पिकांसाठी सहभागी होण्यासाठी https://www.pmfby.gov.in या राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

ही योजना पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, केळी, मोसंबी, पपई, नारळ पिकासाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, अंजीर पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर २०२६ व डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२७ याप्रमाणे अंतिम मुदत राहील. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेत गारपीट या हवामान धोक्यासाठीचा सहभाग ऐच्छिक असून त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणार आहेत किंवा नाही याबाबत घोषणापत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर भरुन देणे आवश्यक राहील.

योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी अधिसूचित फळबागांचे प्रती शेतकरी कमीत कमी २० गुंठे व सर्व फळपिकांचे मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर इतके उत्पादनक्षम क्षेत्र मर्यादा आहे. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास अशा अर्जदारास पुढील किमान ५ वर्षे विमा योजनेचा लाभ मिळणार नाही अशी कार्यवाही कृषि विभागामार्फत करण्यात येईल.

योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अर्थात फार्मर आयडी, डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत फळपिकांची नोंद, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणेचा ७-१२ उतारा, फळबागेचा जिओ टँगिंग फोटो, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button