News: जेजुरीत ब्रेक फेल शिवशाही थेट घरात घुसली मोठा अनर्थ टळला; नागरिकांकडून उड्डाणपुलाची मागणी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीत मंगळवारी सकाळी एका मोठ्या अपघाताचा अनर्थ थोडक्यात टळला. जेजुरी बस स्थानकातून बाहेर पडत असतानाच एका शिवशाही बसचे अचानक ब्रेक निकामी (फेल) झाले. नियंत्रण सुटलेली ही बस मुख्य रस्ता ओलांडून थेट समोरच्या घराच्या भिंतीवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले आहे.
सकाळची वेळ आणि सुदैवी बचाव स्वारगेट ते पंढरपूर या मार्गावर धावणारी शिवशाही क्रमांक (MH 06 BW 4347) मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जेजुरी स्थानकातून बाहेर पडत होती. त्याचवेळी बसचे ब्रेक फेल झाले. सुदैवाने, ज्या घरात बस घुसली, तिथे त्यावेळी कोणीही रहिवासी उपस्थित नव्हते. तसेच, सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ कमी होती. त्यामुळे या भयानक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

उतारामुळे रस्ता ठरतोय जीवघेणा यापूर्वीही याच महामार्गावर आणि याच ठिकाणी भरधाव वेगात असलेली एक खासगी ट्रॅव्हल्स थेट हॉटेलमध्ये घुसल्याची गंभीर घटना घडली होती. बस स्थानकाबाहेर असलेला तीव्र उतार आणि शनिवार-रविवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे हा परिसर धोकादायक बनला आहे. वारंवार अपघात होऊनही प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
उड्डाणपुलाची मागणी सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन या मार्गावर उड्डाणपूल उभारावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करत नागरिकांनी उड्डाणपुलाची जोरदार मागणी केली आहे.



