आपला जिल्हा

News: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सासवड येथे उद्घाटन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज) : येत्या ३६५ दिवसात महाराष्ट्राची कला संस्कृती, नाट्य संस्कृती लोककला, लोकसंगीत, महान विभूतींना अभिवादन आदींचे १ हजार २०० कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, ॲड. राहुल कुल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती प्रथमच राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत असल्याचे सांगून मंत्री ॲड. शेलार म्हणाले, त्यानिमित्ताने हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यापुढे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांना सलामी म्हणून असा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित केला जाईल.

छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांचे प्रेरणादायी होते. आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श योद्धा, पराक्रमी नेतृत्व कसे असावे याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य जतन करण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी मृत्यू पत्करला पण धर्म सोडला नाही म्हणून त्यांना धर्मरक्षक म्हटले जाते. राज्यकारभार, न्यायनिवाडा, शत्रूशी झुंज यांचे आदर्श उदाहरण छत्रपती संभाजी महाराज असून त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. ते संस्कृत, हिंदीचे भाषा प्रभू होते, असेही ते म्हणाले.

राज्यशासनाने यावर्षी पहिल्या वर्षीचा छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार घोषित केला. तो क्रांतिवीर वि. दा. सावरकर यांच्या ‘अनादी मी, अनंत मी’ या गीताला दिला. पॅरिसला मार्सेलीस येथून हा पहिला पुरस्कार जाहीर केला. यावर्षी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम सुरू करण्यात येत असून एक कार्यक्रम संत सोपानदेव यांच्या समाधी ठिकाणी आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार विजय शिवतारे म्हणाले, शंभूराजांचा जन्म पुरंदर येथे झाल्यामुळे येथे त्यांची शासकीय जयंती साजरी व्हावी अशी मागणी दोन वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ मान्यता आणि तरतूद केली असे सांगून शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.

आमदार राहुल कुल म्हणाले, संपूर्ण देशभरात ज्या ज्या वेळी क्रांती झाली त्यामध्ये पुणे आणि परिसराचा मोठा वाटा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास या जिल्ह्यामध्ये घडला. त्यामुळे हा वारसा जतन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल पथक, मर्दानी खेळ, वासुदेव, गोंधळी असे शंभरहून अधिक लोक कलाकारांनी आपली कला सादर केली. प्रामुख्याने स्नेहलता तावडे, तेजा देवकर, ऋतुराज फडके हे कलाकार यात सहभागी झाले. निवेदन प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. नृत्यदिग्दर्शन राकेश शिर्के यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button