News: जेजुरी कडेपठारी रंगणार आज ‘गणपूजा’ उत्सव

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): तीर्थक्षेत्र जेजुरी श्री कडेपठार श्री खंडोबा देवाचे मुळस्थान असणाऱ्या श्री कडेपठार मंदिरात आषाढ शुद्ध प्रतिपदेला गणपूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातॊ. यावर्षी दि. 25/6/2025 रोजी क्षेत्र कडेपठार येथे सालाबादप्रमाणे गणपूजा उसत्व होणार आहे.

भगवान श्री महादेवांनी जगत्कल्याणासाठी श्री मार्तंड भैरव अवतार घेऊन कैलासावरून भूतलावर म्हणजेच कडेपठारावर अवतरले तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा याच दिवशी देव गणांनी श्री मार्तंड भैरवाची भंडाऱ्याने पूजा केली तेव्हापासून हा दिवस ‘गणपूजा’ या नावाने ओळखला जातो.

या दिवशी मुख्य मंदिरामध्ये रात्री नित्य पूजा झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी कडून भंडार वाहिला जातो, स्वयंभू लिंगावर भंडाराच्या राशी लावल्या जातात. भंडाऱ्याची रास अगदी मार्तंड भैरवाच्या मूर्तीभोवती पर्यंत पोहचते त्यावर विविधरंगी फुलांची आकर्षक आरास करण्यात येते. तदनंतर देवाची शेज आरती होऊन आरती मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना काढण्यात येतो सदर छबिना रात्रभर दिवटीच्या प्रकाशात व सनईच्या मंजुळ स्वरामध्ये अगदी पहाटेपर्यंत जागविण्यात येतो. पहाटे छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवाचे अंगावरील भंडार प्रसादासाठी भाविकांची एकच झुंबड उडते आणि भाविक मोठ्या भक्तिभावाने भंडार प्रसाद वर्षभराची शिदोरी म्हणून आपापल्या घरी घेऊन जातात.

दरम्यान वाघ्या मुरुळी तसेच इतर स्थानिक कलाकार आप आपल्या परीने देवापुढे आपली कला सादर करून हजेरी लावतात. देवस्थानच्यावतीने महाराष्ट्रभरातून तसेच इतर राज्यातून हजेरीसाठी आलेल्या वाघ्या मुरळीना सन्मानपत्र देण्यात येते. भंडार प्रसाद वाटप झाल्यानंतर गणपूजेची सांगता होते.