आपला जिल्हा

News: पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. कार्यक्रमास आमदार विजय शिवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) स. दै. हंगे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी पंकज शेळके, पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आणि पराक्रम महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारताला परिचयाचा आहे. संभाजी महाराज प्रचंड पराक्रमी, बुद्धिमान आणि संवेदनशील होते. बालपणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मोहिमा, लढाया, स्वाऱ्यांवर गेल्यामुळे त्यांना पराक्रमाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या शौर्यात प्रचंड ताकद असल्यामुळे त्यांनी बलाढ्य आणि क्रूर अशा औरंगजेबाशी लढताना त्याला ९ वर्षे सळो की पळो केले.

छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी संस्कृतमध्ये लिखाण केले. त्यांना इंग्रजीचे ज्ञान होते आणि हिंदीमध्येही त्यांनी ग्रंथरचना केली. धर्मरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी रयतेवर वात्सल्य, प्रेम केले. त्याच मार्गावर राज्य शासन वाटचाल करत आहे, असेही ॲड. शेलार म्हणाले.

कसबा, रत्नागिरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार -मंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा या गावात संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री सामंत यांनी केली.

छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपट दीड महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. तसेच महाराष्ट्रातील संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा रत्नागिरीत असल्याचे पहायला मिळेल. आता कसबा येथे सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल, असे ते म्हणाले.

आमदार विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याला प्रचंड ऐतिहासिक वारसा असल्याचे सांगून पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा व्हावा अशी मागणी केली.

प्रारंभी मंत्री सामंत आणि ॲड. शेलार यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी महाराजांचा महती सांगणारा पाळणा गायला.

यावेळी मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते पुरंदर प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button