महाराष्ट्र

News: मराठी विश्व संमेलनात मराठी भाषा आणि स्त्री साहित्य विषयी चर्चासत्राचे आयोजन

स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहिल असे लिखाण करावे : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): स्त्रियांच्या साहित्यात लिहिण्याची सुरूवात पुरुषांनी केल्यामुळे स्त्रियांचे अंतरंग लेखनातून यायला वेळ लागला. आता स्त्रिया स्वत: लिहित असल्यामुळे त्यांचे मनोगत व्यक्त होत आहे. स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहिल असे लेखन केले पाहिजे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

विश्व मराठी संमेलनात आयोजित मराठी भाषा आणि स्त्री साहित्य विषयी चर्चासत्रात त्या बोलत होते. या चर्चासत्रात मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, साहित्यिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो या देखील सहभागी झाल्या होत्या. निवेदन उत्तरा मोने यांनी केले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, स्त्रियांना आपल्या कामाची प्रेरणा अनेकदा पुरुषांकडूनच मिळाल्याचे आपण पाहतो. स्त्री संघटना आणि स्त्रियांनी नेहमी सांगितले आहे की, स्त्रियांची भूमिका पुरूषविरोधी नसून पुरुषी वर्चस्वाविरुद्ध आहे. पुरुषाची भूमिका ही सहकाऱ्याची, मित्राची असावी. पुरुषांचा आणि स्त्रियांचा प्रवास जेव्हा माणूसपणाकडे जाईल तेव्हा अजून चांगले घडेल, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, गेल्या ५० वर्षात स्त्रियांच्या जाणीवांचा प्रभाव समाजावर मोठ्या प्रमाणात पडला आहे. स्त्रियांना अबला समजण्याची भूमिका आता बदलली आहे. पंचायत राजमध्ये ५० टक्के आरक्षण ही स्त्रियांसाठी महत्त्वाची बाब ठरली आहे. तथापि, स्त्रियांकडे पाहण्याची नजर आणि भूमिका बदलणे हे आव्हान अजून समोर आहे. त्यामुळे स्त्रियांनी कोणत्याही टिकेला न घाबरता निर्भिडपणे नेहमी लिहिते राहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती भिडे म्हणाल्या, भाषा आणि आशय हे एकाच बाबीचे दोन पैलू आहेत. स्त्रियांनी, स्वत:ला वाटतेय म्हणून लिहिले पाहिजे. आशयाची समृद्धी भाषेतून येते. पूर्वी स्त्रिया घरात असत त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व खूप छोटे होते. स्त्रिया जेव्हापासून घराच्या बाहेर पडू लागल्या तेव्हापासून त्यांचे अनुभव विश्व विस्तारले असून आशयदार लेखन करू लागल्या आहेत. असे असतानाही लेखकाच्या पुस्तकातील पात्रात जी अलिप्तता पाहिजे ती अद्याप स्त्रियांच्या साहित्यात आलेली नाही. हळूहळू अनुभवातून ती जायला काही वेळ लागेल. आजच्या स्त्रिया नोकरी, मोठ्या पदांवर, कॉर्पोरेट जगतात वावरू लागल्या असल्या तरी अद्याप तेथील आशय स्त्रियांच्या साहित्यात आलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती कार्व्हालो म्हणाल्या, भाषा आणि साहित्य हे काळाला जोडणारे असावे. लेखक, कवि, कवयित्री जेव्हा बोलतात ते समाजाचे मनोगत होते. आपल्या संत कवयित्रींनी श्री विठ्ठलाला आपल्या घरातील पुरुष मानले. त्यातून त्यांनी समस्त स्त्रियांचे मनोगत मांडले. जे आपली पणजी, आजी बोलू शकली नाही ते आताच्या स्त्रिया लिहून व्यक्त होत आहेत, ही चांगली बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, जितका माणूस सजग होत असतो तितकी भाषेची समृद्धी सतत होत असते. बोलीभाषेत लेखन झाले पाहिजे. काळाच्या पडद्याआड गेलेले शब्द पुन्हा बाहेर काढले पाहिजेत. महिला लेखकांचा कोश, स्त्रियांच्या कार्याचे कोश तयार केले पाहिजेत. व्याकरणाच्या क्षेत्रात त्या पुढे आल्या पाहिजेत. लोकविज्ञानाचे अभियान करण्यात महिला पुढे आल्या पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button