क्राईम

Crime News: अवैध मद्यवाहतूक, विक्री व बनावट मद्यनिर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; एकूण 40 लाख 5 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध धायरी व दौंड येथे कारवाई करून एकूण ४० लाख ५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग, पुणे यांच्या पथकाने धायरी फाटा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत संशयित टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (एमएच-12-व्हीएल-0955) वाहनाची तपासणी केली असता गोवा राज्यातील खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात मद्य आढळून आले. यात मॅकडॉवेल नं.१ व्हिस्की १८० मिली २८८ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मिली १९२ बाटल्या, इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की १८० मिली २४० बाटल्या असा एकूण रु. २४ लाख ४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घटनास्थळी अमर पुंडलिक बोडरे (रा. सातारा) व चेतन मधुकर बाटे (रा. नऱ्हे, पुणे) यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान चेतन बाटे यांच्या घरी छापा टाकून मॅकडॉवेल नं.१, रॉयल स्टॅग व इंपिरियल ब्ल्यू च्या प्रत्येकी १४४ बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच गोवा एड्रिएल क्लासिक व्हिस्की (७५० मिली) ३६ बाटल्या, विविध बनावट बुचे ६०० नग, रिकाम्या बाटल्या १९२ नग व मोबाईल असा एकूण १ लाख १८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या फ्लॅटमध्ये राहणारे आरोपी तुषार सुभाष काळाणे (रा. पुरंदर) यांच्या घरातून गोवा राज्‍य निर्मित एड्रिएल क्लासिक व्हिस्की २८४ बाटल्या, बनावट बुचे – ७५० नग व मोबाईल असा एकूण ४ लाख रु. ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण रु. २९ लाख ९२ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दौंड विभागा मार्फत १० लाख १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

दौंड येथील स्वामी चिंचोली येथून इंपिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ४८० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या २४० बाटल्या व मोबाईल असा एकूण रुपये ८ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घटनास्थळी वैभव साळुंखे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या घरातून विविध ब्रँड्सच्या एकूण ४३२ बाटल्या, बनावट लेबल्स १३‍०० नग असा एकूण १ लाख २७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत एकूण ३ आरोपी अटकेत असून एकूण १० लाख १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणांचा पुढील तपास अनुक्रमे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, डी विभाग, राज्य उत्पादन शुल्क, पुणे व दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे हे करीत आहेत.

अवैध मद्यविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले. तसेच अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध नियमितपणे कारवाई सुरू राहील. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर तात्काळ टोल फ्री क्र. 1800 233 9999 व दूरध्वनी क्र. 020-26058633 येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button