Crime News: आंतरराज्यीय गांजा तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 235 किलो गांजा व एक महिंद्रा कार असा एकूण 1 कोटी52 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण व अंमली पदार्थ विरोधी पथक (गुन्हे शाखा, पुणे शहर) यांची कारवाई दिनांक २५/११/२०२६ रोजी रात्री शिरूर पोलीस ठाण्याचे पथक रात्रगस्तीवर असताना, दिनांक २६/११/२०२६ रोजी पहाटे ०१.१० वाजण्याच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. ०२ (गुन्हे शाखा, पुणे शहर) चे पोलीस निरीक्षक जीवन माने यांना एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV ७०० कार क्र. MH- २७ DL- ६९८४ मधून काही इसम ओडिशा येथून गांजा घेऊन हैदराबाद-सोलापूर मार्गे पुणे शहर येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर सापळा रचला होता. त्या वेळी त्यांना माहिती मिळाली की, सदरची महिंद्रा कार ही कुरकुंभवरून दौंडच्या दिशेने जात आहे. म्हणून त्यांनी दौंड पोलीसांना सदरची माहिती देऊन नाकाबंदी लावण्यास सांगितले. सदर कार दौंड पोलीसांना हुलकावणी देऊन काष्टीमार्गे शिरूरकडे जाताच पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी शिरूर पोलीसांना सदरची माहिती दिली.
या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर यांनी पथकासह न्हावरा जंक्शन, पुणे-नगर रोड, गोलेगाव रोडवरील सुंदर सृष्टी अपार्टमेंटजवळ अशा ०३ ठिकाणी तात्काळ नाकाबंदी लावली. पहाटे ०३.०० वाजण्याच्या सुमारास सदरची कार भरधाव वेगाने येताना दिसली. पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता शिरूर शहराच्या दिशेने पळ काढला. शिरूर पोलीसांनी शासकीय वाहनाने पाठलाग करून पहाटे ०३.१५ वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक कॉलनीतील सत्यभामा निवास बिल्डिंगसमोरील मोकळ्या जागेत गाडीसह दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
घटनास्थळी पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी/ अंमलदार व शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद पाटील हे तात्काळ दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या परवानगीने आणि पंचांच्या समक्ष कारची झडती घेतली असता, कारच्या डिकीमध्ये खाकी चिकटपट्टीने गुंडाळलेले १२८ गठ्ठे आढळून आले. त्यामध्ये उग्र वासाचा गांजा मिळून आला आहे. तसेच आरोपी नामे १) अजय जगदीश मोहिते, (वय ३० वर्ष), व्यवसाय फर्निचर वर्क, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती व २) समीर पुरुषोत्तम राऊत, (वय २४ वर्षे), व्यवसाय पेवर ब्लॉक ऑपरेटर, रा. मु.पो. सांगोल वाडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून २२ गोण्यांमध्ये भरलेला एकूण २३५ किलो ३९० ग्रॅम वजनाचा हिरवट- तपकिरी रंगाचा गांजा, एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV ७०० कार क्र. MH-२७-DL- ६९८४ व सॅमसंग आणि ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १,५२,९०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी पोलीस अंमलदार अर्जुन साहेबराव भालसिंग यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(c), २०(c), २२(c), २५, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मुळे पुणे- मुंबई सारख्या शहरांना गांजा पुरवनाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यास पोलीसांना यश आले असून यांचे आणखी धागेदोरे काय आहे याबाबत सखोल तपास पुणे ग्रामीण पोलीसांकडुन केला जात आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले (शिरूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. ०२ (पुणे शहर) चे पोलीस निरीक्षक श्री. जीवन माने, सपोनि अफरोज पठाण, सपोनि नितीनकुमार नाईक, शिरूर पोलीस ठाण्याचे सपोनि केणेकर, पोउपनि गोविंद खटिंग, पो. अं. अर्जुन भालसिंग, बालाजी मोटे, राजू मांगडे, पालवे, रतन भोसले, दीपक फुंदे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. ०२ (पुणे शहर) च्या पथकाने केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील, शिरूर पोलीस स्टेशन हे करत आहेत.



