News: ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; सुमारे 82 हजार नागरिकांनी दिली भेट

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून याअंतर्गत आजपर्यंत १५२ ग्रामपंचायतीत घेतलेल्या कार्यक्रमात ८१ हजार ६८४ नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याहस्ते एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.या रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या यात्रेदरम्यान कार्यक्रम झालेल्या गावांमध्ये ३२ आयुष्मान कार्ड, २५ भूमी अभिलेख दाखले, ‘हर घर जल’ च्या २४ जोडण्या देण्यात आल्या. याशिवाय ५७ ओडीएफ शौचालय योजनेचा लाभ देण्यात आला.
यात्रेदरम्यान ७४ किसान क्रेडिट कार्ड आणि ३१ मृदा आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आले. संबंधित गावांमधील १ हजार ४२० खेळाडू, ४ हजार ६७९ विद्यार्थी, १ हजार ५४ स्थानिक कलाकार आणि ११ हजार ९३८ महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी कळविले आहे.