आपला जिल्हा

News: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत जखमी रुग्णांची ससून रुग्णालयात भेट घेऊन संवाद साधला. ‘घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’ अशा शब्दात त्यांनी रुग्णांना धीर दिला. ससून रुग्णालयात या सर्व रुग्णांवर आवश्यक उपचाराची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी घडलेल्या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तलयाच्या सहायक पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. विनायक काळे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

घटनेबद्दल माहिती घेऊन श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेत बाधित कुटुंबाला प्रधानमंत्री कार्यालय तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक ती मदत करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

‘रेड झोन’ मधील नागरिकांबाबत केंद्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय होण्याच्याअनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यसॊबत चर्चा करण्यात येईल. बाधित झालेल्या कुटुंबियांसाठी सामाजिक सुरक्षेची योजना राबविण्यात यावी. आपत्तीजनक परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देता यावा या अनुषंगाने पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाने मोहिम हाती घ्यावी. अशा घटना टाळण्यासाठी महानगरपालिका, उद्योग विभागाने मोहिम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button