आपला जिल्हा

News: पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून 1,937 कोटींचा लाभ; 4.34 लाख शेतकरी पात्र

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत १ हजार ९३७ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सुमारे ४.३४ लाख शेतकरी सध्या या योजनेसाठी पात्र आहेत. दरम्यान, गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. यावेळी राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी संचालक उदय देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी आर्थिक आधार मिळावा, कृषी निविष्ठांची खरेदी करता यावी आणि शेती उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत ही योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांत, प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे थेट बँक खात्यात जमा केले जातात. २०१९ पासून पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना २३ हप्त्यांद्वारे निधी वितरित करण्यात आला असून, आता २४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ५.७६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी – पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये या योजनेअंतर्गत एकूण ५ लाख ७६ हजार २७९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी पीएम किसान पोर्टलवर सद्यस्थितीत सुमारे ४.३४ लाख ३२७ लाभार्थी पात्र आहेत.

लाभासाठी ई-केवायसी व आधार संलग्न खाते आवश्यक – योजनेचा लाभ नियमितपणे मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी जमिनीच्या अभिलेखातील नोंदी अद्ययावत ठेवणे, ई-केवायसी पूर्ण करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि आवश्यक शेतकरी ओळख क्रमांकाची पूर्तता करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने निधी जमा केला जातो. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या समन्वयातून योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या आणि आजअखेर वितरित निधी – आंबेगाव तालुक्यात ३७ हजार २३१ लाभार्थी असून १५१ कोटी रुपये, बारामती ५० हजार ७३१ लाभार्थी व २३० कोटी रुपये, भोर २५ हजार १३७ लाभार्थी व १०४ कोटी रुपये, दौंड ४२ हजार ४२० लाभार्थी व १९५ कोटी रुपये, हवेली १० हजार ९५३ लाभार्थी व ५६ कोटी रुपये, इंदापूर ४८ हजार ७४० लाभार्थी व २१९ कोटी रुपये, जुन्नर ५२ हजार २८१ लाभार्थी व २३१ कोटी रुपये, खेड ४३ हजार ६३३ लाभार्थी व २०० कोटी रुपये, मावळ १७ हजार ४९६ लाभार्थी व ७७ कोटी रुपये, मुळशी १३ हजार ५५ लाभार्थी व ७१ कोटी रुपये, पुरंदर ३२ हजार १०८ लाभार्थी व १३३ कोटी रुपये, शिरूर ५१ हजार ५०८ लाभार्थी व २२९ कोटी रुपये, तर वेल्हा तालुक्यात ९ हजार ३४ लाभार्थी असून ४० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button