क्राईम

Crime News: रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी अटक, चार घरफोडीचे गुन्हे उघड, एकूण 38,50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक ०५/१०/२०२५ रोजी ओतूर पोलीस स्टेशन गु.र.नं. २६५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३),३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल असून, कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. तसेच अशाच प्रकारच्या चोऱ्या नारायणगाव व ओतूर या ठिकाणी झाल्या असल्याने, सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदरचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सुरू करण्यात आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. घटनास्थळाच्या आजूबाजूला एक संशयित कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली. त्या कारचा सीसीटीव्ही फुटेजव्दारे ओतूरपासून नाशिकपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माग काढला व सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आहे.

नाशिक येथील इंदिरानगर व वडाळा या परिसरामध्ये गोपनीय बातमीदारांमार्फत स्थानिक गुन्हे शाखेने सदर वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी कार वडाळा, नाशिक येथे राहत असलेला सोनू उर्फ शरीफ रसूल शेख हा वापरत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच त्याच्यासोबत त्याचे इतर दोन साथीदार, वसीम पठाण व अदनान पठाण हे देखील असल्याचे समजले.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक तसेच ओतूर पोलीस स्टेशनकडील पथकाने सापळा लावून वडाळा, लासलगाव नाशिक परिसरामध्ये खालीलप्रमाणे आरोपींना ताब्यात घेतले. १) वसीम मुनीर पठाण, (वय २९ वर्ष), रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, नाशिक, २) अदनान युनूस पठाण, (वय २६ वर्षे), सध्या रा. वडाळा, इंदिरानगर, नाशिक, मूळ रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, नाशिक, ३) सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख, (वय ४० वर्षे), रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच २ किलो ७७० ग्रॅम चांदी, २,००,००० रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार, असा एकूण ३८,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे:

१) ओतूर पो स्टे गु.र.नन २६५/२०२६ बीएनएस कलम ३३१(३), ३०५(अ)

२) ओतूर पो स्टे गु.र.नन २१८/२०२६ BNS कलम ३३१ (३), ३३१ (४),३०५

३) ओतूर पो स्टे गु.र.नन १३७/२०२६ BNS कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ)

४) नारायणगाव पो स्टे गु.र.नान २०३/२०२६ BNS कलम ३३१ (३), ३०५ (अ)

तसेच चांदीचे दागिने विकत घेणारा आरोपी नामे सागर अशोक शिंदे, वय ३० वर्षे, रा. विंचूर, ता. निफाड, नाशिक याला देखील अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी पकडले जाऊ नये याकरिता वायरलेस वॉकी टॉकी चा वापर केला होता. त्या सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील अधिक तपास ओतूर पोलीस स्टेशन करत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार दीपक साबळे, पोलीस अंमलदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, भारत मोहोळ, चेतन पाटील तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी, विशाल गोडसे, धनंजय पालवे यांनी केली आहे. पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button