Crime News: पिसर्वेत शेतातील 19 डुकरांची चोरी; तब्बल 1 लाख 76 हजारांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिसर्वे गावात शेतातील डुकरांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये विविध जातींची तब्बल १९ डुकरे चोरीला गेली असून, त्यांची एकूण किंमत १ लाख ७६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पिसर्वे येथील एका शेतकऱ्याने गावातीलच जागा भाडेतत्त्वावर घेऊन गेल्या दोन वर्षांपासून डुक्कर पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या शेतात विविध जातींची एकूण ३८ डुकरे होती. दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता डुकरांना खाद्य-पाणी देऊन शेतकऱ्याने शेडच्या दरवाजाला कुलूप लावले आणि ते घरी परतले. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मित्राचा फोन आला. शेतातील डुकरांची पिल्ले शेडच्या बाहेर आल्याचे त्याने सांगितले.

शेतकरी शेडवर पोहोचले असता, शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडल्याचे निदर्शनास आले. तसेच शेतात लावलेला सीसीटीव्ही कॅमेराही तोडण्यात आल्याचे आढळून आले. शेतातील पाहणी केली असता लँड्रेस जातीच्या १४ माद्या, ड्युरॉक जातीचा १ नर आणि लार्ज व्हाईट जातीच्या ४ माद्या, अशी एकूण १९ डुकरे गायब असल्याचे समोर आले. या १९ डुकरांची एकूण किंमत १ लाख ७६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्यासाठी शेडचे कुलूप तोडून डुकरांची चोरी केल्याचा आरोप करत शेतकऱ्याने जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



