News: DCS MH मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावर पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या DCS MH मोबाईल ॲपद्वारे सहाय्यक स्तरावर पीक नोंदणीचे काम दिनांक ११ ऑगस्ट २०२६ पासून सुरू आहे. पीक पाहणीचे काम अधिक जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने तसेच शेतकऱ्यांच्या सोयीचे होण्यासाठी DCS MH मोबाईल ॲपमध्ये शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी करण्याची सुविधा दि. ११ सप्टेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. (सदर मोबाईल ॲपमध्ये आवश्यकतेनुसार अधिक विकसित सुविधा समाविष्ट करून त्याचे अद्ययावत व्हर्जन लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल).
या सुविधेअंतर्गत आता शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून DCS MH मोबाईल ॲपमध्ये आपला शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) प्रविष्ट करून आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करू शकणार आहेत. शेतकरी ओळख क्रमांकाशी संलग्न असलेल्या सर्व शेतजमिनींची पीक नोंदणी शेतकऱ्यांना या सुविधेद्वारे करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक व वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. पीक नोंदणीची माहिती विविध शासकीय योजना, अनुदान व इतर शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी DCS MH मोबाईल ॲपचा वापर करून आपल्या शेतातील पिकांची नोंदणी शक्य तितक्या लवकर, तसेच आजच करून घ्यावी आणि विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे.



