आपला जिल्हा

News: समाज कल्याण विभागातर्फे पुणे जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवाकार्याच्या निमित्ताने राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत सेवा सेतू अभियान, इनोव्हेशन चॅलेंज, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योती यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पची रांगोळी, नमो सेवागाथा, जल-जन-सेवा संकल्प यात्रा आणि जनसेवक महाकुंभ आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

समाज कल्याण विभागामार्फत पुणे जिल्ह्यात तालुकास्तरावर तसेच पुणे शहरात रक्तदान शिबिरे, अनाथालय व वृद्धाश्रम भेटी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे, योग व ध्यान सत्रे, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, वंचित मुलांना शैक्षणिक सहकार्य, व्यसनमुक्ती आणि सायबर सुरक्षा जनजागृती असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.

तसेच मतदार जागरूकता व नोंदणी, शासकीय योजनांची जनजागृती, जनकल्याणकारी योजना, राष्ट्रीय प्रतीके आणि विकसित भारताची संकल्पना या विषयांवर मानवी रांगोळीचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन संवाद साधण्यात येणार आहे.

या अभियानात समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वसतिगृहांचे गृहप्रमुख व गृहपाल, निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी तसेच वसतिगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button