आपला जिल्हा

News: डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करावा : उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): गणेश उत्सवात उत्साह कमी करण्याचा आमचा हेतू नाही, उत्साह वाढविण्यासाठी कायदा नियमांचा वापर करा. या उत्सवात दुष्परिणाम व दुर्घटना टाळण्यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करा. असे आवाहन भोर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांनी केले.

जेजुरी पोलिस स्टेशनच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवानिमित नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्र सिंह गौर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की यांत्रिकीकरणाची वाद्ये वाजविल्यामुळे त्याचे दुष्परिणाम वाढले आहेत, नैसर्गिक व पारंपरिक वाद्ये वापरल्यास त्या संबंधीत कलाकारांना उदरनिर्वाहाची संधी प्राप्त होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळानी सहकार्य करावे.

या आढावा बैठकीवेळी जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक योगेश जगताप, रोहित खोमणे, अभिजीत कुदळे,माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख, नायब तहसीलदार संदीप पाटील, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रताप साळवे, महावितरण मंडळाचे संतोष कर्णवळ, जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार,पोलिस हवालदार आण्णासाहेब देशमुख, पत्रकार, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. जेजुरी हे उत्सव यात्रा जत्रेचे गाव आहे. येथील नागरिक पोलिसांना सहकार्य करून माणुसकीचे दर्शन घडविणारे आहेत. वीज मंडळाने उत्सव काळात वीज पुरवठा अखंडित ठेवावा,मंडळानी विधायक उपक्रम राबवून आदर्श निर्माण करावा , उत्सवाला कसलेही गालबोट लागू नये याची सर्वांनी काळजी घेऊ या असे सांगितले.

पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी गणेश उत्सव काळात कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी, नियमांचे पालन करावे, सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी ,उत्कृष्ट मंडळांना जेजुरी पोलिस स्टेशनच्या वतीने गणराया अवार्ड दिले जातील असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेजुरी देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राऊत तर आभार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button