क्राईम

Crime News: प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्यून): इसम नामे दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. मारोजी भुमकर चौक, हिंजवडी, पुणे) याचे एका तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. शिक्षणादरम्यान संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच कारणावरून गुरुवारी (६ ऑगस्ट) दिनेश झांबरे हा संबंधित तरुण व तरुणी राहत असलेल्या ठिकाणी गेला. त्याने दोघांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपी त्याच्या ताब्यातील इरटिगा कार (क. MH-13-EK-5828) मधून पुणे – सोलापूर मार्गे पंढरपूरकडे पळून जात होता.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी उरूळीकांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या वाहनाची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उरूळीकांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर तातडीने नाकाबंदी करण्याचे नियोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सोमनाथ चितारे, सचिन जगताप, कमलेश होले, निलेश जाधव, सचिन मोरे, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, विकास लगस तसेच पोलीस कॉन्स्टेबल ऋषीकेश रासकर, अश्वजित मोहोड व सुवर्णा गायकवाड यांनी उरूळीकांचन पोलीस ठाण्यासमोर पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी केली. यावेळी भरधाव वेगाने येणारी संशयित इरटिगा कार पोलिसांनी धाडसाने अडवून चालकास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हिंजवडी येथे खून व हल्ल्याची घटना केल्याची कबुली दिली. त्यानंतर दिनेश महादेव झांबरे यास वाहनासह ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, आरोपीचा पाठलाग करत हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधावणे, नरेश बलसाने, पोलीस हवालदार प्रशांत गिलबिले तसेच पोलीस कॉन्स्टेबल मिनीनाथ पवार व ओमप्रकाश कांबळे हे उरूळीकांचन पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दिनेश झांबरे यास हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button