Crime News: दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक; एक जणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव गावाजवळ म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर शुक्रवारी दि. ३/७/२०२६ रोजी सायंकाळी झालेल्या समोरासमोरच्या दुचाकी अपघातात दुर्गेश ठाकूर (वय ३५ वर्षे) , रा. मध्य प्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात दुसऱ्या अज्ञात दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाला असून सदर घटनेची माहिती रुपेश मुन्ना ठाकूर (वय ३० वर्षे), रा. कुलारी, ता. देवरी, जि. सागर, मध्य प्रदेश यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फेटल मोटार अपघात रजिस्टर क्रं.०६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश ठाकूर हे एमएच-१२-एक्सडी-८८६७ क्रमांकाच्या मोटार सायकल वरून पारगाव मेमाणे येथून नायगावच्या दिशेने जात होते. सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास नायगाव गावच्या हद्दीतील म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात मोटर सायकलची त्यांच्या मोटार सायकलला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुर्गेश ठाकूर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटना स्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील अज्ञात चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी उरुळीकांचन येथे हलविण्यात आले.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कारंडे हे करीत आहेत.



