क्राईम

News: अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला.

शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करून संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्टमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन होत असल्याने १८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करून परवाना निलंबित करण्यात आला.

याशिवाय, ताथवडे (पुणे) येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button