News: ‘साथी’ पोर्टलच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे विभागस्तरीय प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे येथे ‘साथी’ पोर्टलचे विभागस्तरीय प्रशिक्षण संपन्न झाले. आयुक्त (कृषी) सुरज मांढरे, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर आणि विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणास पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील ९८ कृषी अधिकारी व गुणवत्ता नियंत्रणाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये साथी पोर्टलची कार्यप्रणाली, बियाणे प्रमाणीकरण प्रक्रिया तसेच पोर्टलचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी क्यूआर कोडद्वारे बियाण्यांची सत्यता पडताळणी, थेट लाभ हस्तांतरण, तर विक्रेत्यांसाठी डिजिटल इन्व्हेंटरी व्यवस्थापन, परवाना नूतनीकरण व ई-बिल सुविधा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे बियाण्यांची ट्रेसेबिलिटी, गुणवत्ता नियंत्रण आणि बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा प्रभावी वापर करण्याबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती मिळाली. पोर्टलच्या वापरासंदर्भातील अडचणींसाठी संबंधित जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी व मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.


