News: नवस्थापित देवमळा ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनी पहिले ऐतिहासिक ध्वजारोहण

प्रतिनिधी(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : नव्याने स्थापन झालेल्या देवमळा ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिल्यांदाच ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामपंचायतीचे नियुक्त प्रशासक तथा विस्तार अधिकारी सागर कांबळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर घोषणा देत उपस्थितांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. याच दिवशी स्टेशन नगर परिसरातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यानंतर देवमळा येथे ग्रामपंचायतीच्या भावी कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, विकासकामे तसेच बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

या वेळी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीमुळे गावाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर देवमळा ग्रामपंचायत अस्तित्वात आल्याने नागरिकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हा दिवस देवमळा ग्रामस्थांसाठी नवीन विकासाची सुरुवात आणि स्वाभिमानाचा ऐतिहासिक क्षण ठरल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी पुंडलिक म्हस्के उपस्थित होते. तसेच देवमळा ग्रामपंचायत स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे ग्रामस्थ व ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक, महिला-भगिनी, युवक तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


