News: “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी e-KYC सुविधा उपलब्ध : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा, यासाठी शासनाने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थ्यांना ही प्रक्रिया स्वतःच्या मोबाईलवरून करता येणार असून, पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री सौ. आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवणे सुलभ होईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक सक्षम करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) पद्धतीने आर्थिक सहाय्य दिले जाते.

महिला व बालविकास विभागाकडून e-KYC प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सोपी, सुलभ व सहज असून, लाभार्थ्यांनी गोंधळून न जाता व कोणत्याही आर्थिक मागणीस बळी न पडता ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सौ. आदिती तटकरे यांनी केले आहे.



