आपला जिल्हा

News: शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करावी: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे कसे वळविता येईल यादृष्टीनेदेखील प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

कृषी विभागाने आपले नियमित काम करत असताना वैशिष्ट्यपूर्ण बाबी करण्यावर भर द्यावा, असे सांगून ते म्हणाले, पुणे व मुंबई यातील जवळचे अंतर, मोठी बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी जवळची सुविधा असेलले मुंबई शहर या जिल्ह्यासाठी जमेच्या बाजू आहेत. जिल्ह्यात फलोत्पादन आणि फूल शेतीच्या वाढीला मोठा वाव असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येऊ शकते.

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात सध्या लागवड होत असलेली वैशिष्ट्यपूर्ण फळपिके, फूल शेती तसेच अन्य कृषीमाल व त्यांचे शेतकरी व लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. एकच वैशिष्ट्यपूर्ण पीक अधिक प्रमाणात उत्पादित करणारे गाव किंवा गावांचा समूह निवडून या पिकाचे क्षेत्र कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. त्या गावाची प्रसिद्धी त्या पिकांच्या नावाने कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत.

सध्या अस्तित्वात असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गटांमध्ये अधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे. त्यांच्या माध्यमातून उत्पादित करण्यात येणाऱ्या कृषीमालाची प्रचार प्रसिद्धी (ब्रँडिंग), प्रक्रियेसाठी यंत्रसामुग्री तसेच बाजारपेठेशी जोडणी करुन देण्याच्यादृष्टीने जिल्हा नियोजन समितीतून निधीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावा.

केंद्र शासनाचे नैसर्गिक शेती अभियान, राष्ट्रीय फळबाग अभियान, ठिबक सिंचन व अन्य सूक्ष्म सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदी योजनांचे एकत्रिकरण करून वैशिष्ट्यपूर्ण पिकांच्या लागवडीला चालना देता येऊ शकते.

यावेळी श्री. काचोळे यांनी जिल्ह्यात महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींना प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन खरेदीसाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्याची मागणी केली. त्यावर सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस, पुरंदर तालुक्यातील अंजीर व सिताफळ, इंदापूर तालुक्यातील द्राक्षे, केळी, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील नाचणी, बारामती तालुक्यातील कोरडवाहू भागात सूर्यफूल, करडई, साबळेवाडी, म्हसोबावाडी परिसरातील रेशीम उत्पादन, मावळ व आंबेगाव तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ, मावळ तालुक्यातील फूलशेती, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील भाजीपाला उत्पादन आदींच्या अनुषंगाने संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींकडून करण्यात येत असलेल्या नाविण्यपूर्ण कृषीविषयक उपक्रमांची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button