Crime News: धक्कादायक! जेजुरी: अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूला शेजारी दुचाकीवर जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडे गावठी कट्टा आढळून आला आहे. पोलिसांनी विचारपूस केली असता हा गावठी कट्टा व मोटार सायकल मित्राची असुन त्यांच्याकडे अजुन एक अशाच प्रकारचा पिस्तुल असल्याचे सांगितल्याने दोघां विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या माहितीनुसार भोर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक सोमेश भंगवतराव राउत यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलांकडे पिस्तूल आढळून आल्याची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी सोमेश राऊत हे शुक्रवार दि.२८ जून रोजी सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जेजुरी गावचे हदीत जेजुरी रेल्वे ब्रिजजवळ विधीसंघर्षित अल्पवयीन बालक रा.जवळाअर्जुन ता. पुरंदर, जि. पुणे हा त्याचे ताब्यात बेकायदा बिगरपरवाना २० हजार रूपये किंमतीचे एक सिल्वर रंगाचा लोखंडी, त्याचे हॅन्ड ग्रीपजवळ दोन्ही बाजुला लाल रंगाचे फायबर असलेला पिस्तुल बाळगताना आढळून आला. त्या पिस्तूलवर कोणत्याही कपंनीचा लोगो अथवा मार्क नाही. तसेच यामाहा कंपनीचे मोटार सायकल वरून जात होता. त्याचेकडे पिस्तुलबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे पिस्तुल हे माझा मित्र रा. खैरवाडी ता. पुरंदर, जि. पुणे याने माझेकडे ठेवणेसाठी दिला असुन, त्याचेकडे आणखीन एक अशाच प्रकारचा पिस्तुल आहे. ही मोटार सायकल देखील त्याचीच असल्याचे सांगितले आहे. म्हणुन दोन विधीसंघर्षित (अल्पवयीन) बालक रा. जवळाअर्जुन ता. पुरंदर व रा. खैरवाडी, ता.पुरंदर यांच्या विरूध्द कायदेशीर फिर्याद सोमेश राऊत यांनी दिली आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पाटील हे करत आहेत.



