News: जेजुरी: अतिप्राचीन लवथळेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे- पंढरपूर महामार्गावरील श्री क्षेत्र जेजुरी येथील पुरातन लवथळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून पुरातत्त्व खात्यातर्फे मंदिराच्या दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. पडझड झालेल्या या मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेतल्याने मंदिराचे रूप पालटणार आहे. खंडोबाच्या पौराणिक कथेमध्ये मणीसूर-मल्लासूर हे दैत्य ऋषिमुनींना त्रास देत असताना लवथळेश्वर मंदिर परिसरामध्ये ते सुरक्षित राहिल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी असलेले मंदिर हे साधारणतः चारशे वर्षांपूर्वी जमिनीच्या भूगर्भामध्ये बांधलेले होते. येथे एक शिवपिंड असून लवथळेश्वर या नावानेच हे मंदिर ओळखले जाते. मंदिर बांधताना अतिशय कमी खर्चात आणि कमी वेळेत बांधण्यात आल्याचे पुरातत्त्व खात्याच्या निदर्शनाला आले आहे. जमिनीला समांतर असल्याने अनेकदा पावसाळ्यामध्ये पाणी जाऊन मंदिराचा गाभारा, परिसरातील भिंतीचे दगड, छत, दगडी खांब याची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. पुरातत्त्व खात्याने केवळ डागडुजी न करता जुन्याच पद्धतीने मंदिर बांधण्यासाठी काम सुरू केले आहे. मंदिर परिसरात पाण्याची एक पुष्कर्णी आहे.

समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य याच मंदिरामध्ये शंकराची आरती ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठीकाळा त्रिनेत्री ज्वाळा’ ही शंकराची आरती समर्थ रामदास स्वामी यांना याच मंदिरामध्ये स्फुरली असे सांगितले जाते. जेजुरीला आल्यानंतर समर्थ रामदास स्वामींचे या मंदिरात वास्तव्य असायचे. लवथळेश्वर मंदिरामध्ये त्यांना शंकराची आरती स्फुरली. सर्व शंकराच्या मंदिरामध्ये ही आरती गायली जाते.
जेजुरी येथील ग्रामस्थांची लवथळेश्वर मंदिरावर श्रद्धा आहे. मंदिराचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच लवतीर्थ कुंडाचे ही काम आता चालू असलेल्या कामाबरोबर पुरातत्त्व खात्याने करावे अशी मागणी ही ग्रामस्थांकडून होत आहे.
“लवथळेश्वर मंदिर अत्यंत कमजोर झाले आहे. यातील दगडांवर पूर्वी सिमेंटचा गिलावा केल्यामुळे मंदिर राहिले. परंतु, सिमेंट काढल्याने मंदिराचे मूळ स्वरूप उघड झाले. पाणी आणि हवामानामुळे मंदिराच्या दगडांची झीज झाली आहे. मंदिराला धोका निर्माण झाल्याने मंदिराचे दगड आणि मूळ रूप तसेच ठेवून दुरुस्तीचे काम जुन्या पद्धतीने चुन्याच्या मिश्रणाने केले जाणार आहे. राज्य शासनाने लवथळेश्वर मंदिर, होळकर तलाव, बल्लाळेश्वर मंदिर संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पूर्वीप्रमाणे मंदिर करण्यात येणार आहे.” – विलास वहाणे, सहायक संचालक, पुरातत्त्व खाते