आपला जिल्हा

News: ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे जिल्ह्यात कुठेही दस्त नोंदणी; नागरिकांना अत्याधुनिक सुविधा: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): नागरिकांना मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, आधुनिक आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिले मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील नोंदणी कार्यालये आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कोथरूड येथील रिव्होलेशन मॉलमधील या कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले.

बावनकुळे म्हणाले, “मुद्रांक व नोंदणी विभागाकडे येणारा प्रत्येक नागरिक हा आमचा ग्राहक आहे. रजिस्ट्री करणारे, दस्त लिहून देणारे आणि दस्त लिहून घेणारे यांना उत्कृष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी मुद्रांक व नोंदणी कार्यालये चांगली, सुसज्ज आणि दर्जेदार असावीत, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. त्यानुसार राज्यातील पहिले मॉडेल कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आले आहे.”

‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे कुठेही नोंदणी शक्य – ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’**मुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, आता जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या मालमत्तेची दस्त नोंदणी त्याच जिल्ह्यातील कोणत्याही सक्षम नोंदणी कार्यालयात करता येते. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करण्याची सक्ती राहिलेली नाही.

पुणे जिल्ह्याचे उदाहरण देताना बावनकुळे म्हणाले, “बारामतीची रजिस्ट्री पुण्यात करता येते. त्याचप्रमाणे इंदापूर, दौंड, जुन्नर, मावळ, खेड किंवा पुणे जिल्ह्यातील कोणत्याही भागातील मालमत्तेची नोंदणी नागरिकांना त्यांच्या सोयीच्या कार्यालयात करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.”

नागरिकांना उत्कृष्ट सुविधा देण्यावर भर – मॉडेल कार्यालयाच्या संकल्पनेबाबत श्री. बावनकुळे म्हणाले, “नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात चांगले वातावरण, व्यवस्थित प्रतीक्षा व्यवस्था आणि आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना सन्मानपूर्वक सेवा मिळावी, यासाठी या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे.

“मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. नागरिकांना कार्यालयात वारंवार येण्याची गरज पडू नये, अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध व्हाव्यात आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी विभागाचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

राज्यभर मॉडेल कार्यालये उभारणार- पुण्यातील मॉडेल कार्यालय हे राज्यातील इतर नोंदणी कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. “पुण्यातील हे पहिले मॉडेल कार्यालय केवळ एक कार्यालय म्हणून न पाहता, भविष्यातील नोंदणी व्यवस्थेचा नमुना म्हणून पाहिले पाहिजे. नागरिकांना उत्तम सुविधा देतानाच कार्यालयीन कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“नागरिकांना सन्मानपूर्वक आणि त्रासमुक्त सेवा मिळणे, नोंदणी प्रक्रियेतील अडचणी कमी होणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा अधिक जलद होणे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’, ‘ई-प्रमाण’ आणि अशा डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून मुद्रांक व नोंदणी विभागाची सेवा व्यवस्था अधिक नागरिकाभिमुख करण्यात येत आहे,” असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button