क्राईम

Crime News: आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीने एका रात्रीत पाच ठिकाणी टाकलेले सशस्त्र दरोडयाचे गुन्हे उघडकीस; एकूण 21 गंभीर गुन्हे आले उघडकीस, सुमारे 25 लाख रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): मागील सहा महिन्यामध्ये दौंड, बारामती, जुन्नर विभागात एक सारख्या गुन्हे कार्यपद्धतीचा अवलंब झालेल्या गंभीर जबरी चोरीच्या गुन्हयाच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये नागरीकांना मारहाण झाली होती, वाटसरूंना हत्याराचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. दौंड पोलीस स्टेशन हद्दीत दि. १०/०६/२०२६ रोजीचे रात्री चार ठिकाणी तसेच श्रीगोंदा पो स्टे चे हद्दीत देखील एका ठिकाणी दरोडेखोरांकडून सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते.

त्याअनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९०/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१०(२), ३११, ११८ (१), शस्त्र अधिनियम ४,२५ प्रमाणे दि. १०/०६/२०२६ रोजी गुन्हा दाखल आहे. खोरवडी गावचे हद्दीतील बाबीरनगर, आवदेवस्ती, आवाळेवस्ती, खोरवडी अशा चार ठिकाणी दि. १०/०६/२०२६ रोजी रात्री ०१/०० चे दरम्यान अनोळखी सहा ते सात दरोडेखोरांनी शिवीगाळ, दमदाटी करत हत्याराने माराहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल असा एकूण ७,१०,०००/- रू. किं.चा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीने चोरून नेला होता. त्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

एकाच रात्रीमध्ये दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार ठिकाणी दरोडयाच्या घटना घडल्या होत्या. सदर प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण यांनी तात्काळ स्था.गु.शा. व उपविभागातील पोलीस स्टेशनचे तपास पथकांची बैठक घेवून एकूण सहा पथके तयार केली. सन २०२६ मधील दाखल गुन्हयांचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मागदर्शन करून सुचना केल्या. त्या अनुषंगाने तपास पथकांनी तपास सुरू केला. तपास पथकाने नमुद गुन्हया सोबत मागील काही गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेतला. गुन्हे कार्यपद्धती साम्य असलेल्या काही घटनांची माहिती एकत्रित करणेत आली. तांत्रिक विश्लेषणासाठी विशेष पथक नियुक्त केले. साक्षीदार व फिर्यादी यांचेशी संवाद साधून गुन्हयातील आरोपींचे वर्णन घेण्यात आले, गुन्हे कार्यपद्धतीची माहिती घेवून गोपनीय बातमीदारांना माहिती पुरविणेत आली होती. घटनास्थळापासून सुमारे ५० किमी पर्यंत रस्त्यालगत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करणेत आले, फुटेज मधील उपलब्ध माहितीचे आधारे खात्री झाली की, सदरचे आरोपी हे अहिल्यानगर जिल्हयातून गुन्हा करणेसाठी आले व पुन्हा अहिल्यानगर जिल्हयाकडे गेले आहेत.

स्था.गु.शा.चे तपास पथक दि. १३/०६/२०२६ रोजी तपास करत असताना, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी १) गणेश मंगेश काळे रा. कुळधरण ता. कर्जत जि. अहिल्यानगर, २) विशाल हंबरडया काळे रा. चिखली ता. आष्टी जि.बीड, ३) किशोर रावण भोसले रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४) प्रविण ऊर्फ पप्पु लाला भोसले व त्यांचे इतर साथीदार यांचे मदतीने केला असल्याची खात्री झाली. सदरचे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी सशस्त्र दरोडा, जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने व ते राहते घरी न राहता, शेतात, माळावर, विटभट्टीवर वेषांतर करून राहतात अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने दि. १३/०६/२०२६ रोजी संपूर्ण रात्रभर वेगवेगळी तपास पथके तयार करून बाभुळगाव खालसा ता. कर्जत जि. अहिल्यानगर व चिखली ता. आष्टी जि. बीड या ठिकाणी एकाच वेळी पथकांमार्फत कारवाई करून गुन्हयातील आरोपी नामे १) गणेश मंगेश काळे, (वय २२ वर्षे), रा. कुळधरण ता. कर्जत जि. अहिल्यानगर, २) विशाल हंबरडया काळे, (वय २१ वर्षे), रा. चिखली ता. आष्टी जि.बीड, ३) किशोर रावण भोसले (वय १९ वर्षे) रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेवून ४) एक विधीसंघर्षित बालक यास रखवालीत घेण्यात आले आहे. आरोपींकडे तपास करणेत आला, तपासादरम्यान आरोपींनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने वरील गुन्हा केला असल्याचे सांगितले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अटकेतील आरोपींकडे अधिक तपास केला असता, त्यांनी पुणे ग्रामीण हद्दीतील गुन्हे केले असल्याचे सांगितले.

सदर गुन्हयातील तीनही आरोपी पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून त्यांचेकडे करणेत आलेल्या तपासादरम्यान सुमारे १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण बाजारमुल्य प्रमाणे २५ लाख रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. आरोपींची दि. १८/०६/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आली आहे. नमुद आरोपींकडून पुणे ग्रामीण जिल्हयातील दरोडयाच्या ०४ घटना, जबरी चोरीचे ०६ गुन्हे, घरफोडीचे ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

त्याचप्रमाणे आरोपींकडे अधिक तपास केला असता, त्यांनी अहिल्यानगर जिल्हयातील खालील गुन्हे केल्याचे सांगितले असून अहिल्यानगर जिल्हयातील दरोडयाचे ०३, जबरी चोरीचे ०३, घर फोडीचे ०२ असे एकूण ०८ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वरील सराईत आरोपीपैकी आरोपी गणेश काळे याचेवर यापूर्वी दरोडा व चोरीचे ०८ गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी विशाल काळे याचेवर यापूर्वी ०२ गंभीर गुन्हे, आरोपी किशोर भोसले याचेवर यापुर्वी ०१ गुन्हा दाखल असून आरोपी प्रविण भोसले याचेवर ११ गंभीर गुन्हे दाखल असून तो बऱ्याच गुन्हयांमध्ये फरार आहे. स्था.गु.शा.पुणे ग्रामीणच्या तपास पथकांनी मागील अडीच महिन्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सुमारे ९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, पुणे विभाग, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, बापुराव दडस, दौंड उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पो स्टे. चे पो. नि. हेमंत शेडगे, माळेगाव पो.स्टे. चे सपोनि कुलदीप संकपाळ, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, स्था.गु. शाखेचे पोलीस अंमलदार, शिवाजी निकम, असिफ शेख, सचिन घाडगे, किशोर तेलंग, योगेश नागरगोजे, राजू मोमीण, गणेश धनवे, संतोष भापकर, सुभाष राउत, गुरुनाथ गायकवाड, विकास कापरे, सुलतान डांगे, रईस मुलाणी, तुषार चव्हाण, गणेश डेरे, धिरज जाधव, तुषार भोईटे, स्वप्निल अहीवळे, अजय घुले, गणेश होळकर, गुलाब पाटील, शैलेश स्वामी, राहुल पवार, समाधान नाईकनवरे, मपोहवा सुजाता कदम, भाउसाहेब पुंड, अजय देडे, दौंड पोलीस स्टेशनचे पो.स.ई. अब्दुल बिद्री, पोसई रुपेश कदम, पोलीस अंमलदार नितीन बोराडे, धनंजय गाढवे, पवन माने, गोरख हजारे, सागर म्हेत्रे, रमेश चितारे, संतोष भोसले, सचिन साप्ते, ओमराज कुमकुटे, महेंद्र लोहार, सोमनाथ चाँडे, किरण पांढरे, संजय कोठावळे, महिला पोलीस अंमलदार वैशाली बनसोडे, काजल शिंदे, ऊरूळी कांचन पो. स्टे. चे सचिन जगताप, प्रविण चौधर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button