News: खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांनी अनुदानित रासायनिक खतांची विक्री ही ई-पॉस (e-PoS) प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. तसेच खत विक्रीच्या नोंदी या तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

विक्रेत्यांच्या ई-पॉस प्रणालीवरील खत साठा व प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा यामध्ये कोणतीही तफावत राहू नये. यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद ही आयएफएमएस (IFMS) प्रणालीमध्ये त्याच क्षणी (Real Time) घेणे बंधनकारक आहे.
ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन L1 सिक्युरिटी ई-पॉस मशीन प्राप्त केलेले नाहीत त्यांनी संबंधित जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून मशीन प्राप्त करून ती कार्यान्वित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ई-पॉस प्रणालीवरील साठा व प्रत्यक्ष साठा यात फरक आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांच्या परवान्यावर नियमित कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे गावसाने यांनी स्पष्ट केले आहे.


