News: लम्पी चर्म रोग प्रतिबंध उपाय योजना प्रभावीपणे राबवाव्यात : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण मोहीम तसेच लम्पी रोग प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने या रोगाचे नियंत्रण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी डूडी बोलत होते.

जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाने जनावरे आजारी असल्याने आज अखेर ९०६ जनावरांना या रोगाची बाधा झालेली आहे. यापैकी औषधोपचाराने ५९१ जनावरे बरी झाली असून १५ जनावरे मयत झाली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये ३०० जनावरांवर उपचार सुरू असून दिवसेंदिवस रोगाचा प्रसार होऊन यामध्ये वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील शिरुर, आंबेगाव, जुन्नर मध्ये सर्वाधिक जनावरांना लम्पी चर्मरोग विषाणूची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी संसर्ग केंद्राच्या पाच किलोमीटर परिसरामध्ये लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डूडी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

रोग नियंत्रणाच्या दृष्टीने मनुष्यबळ कमी आहे अशा ठिकाणी जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून इतर अधिकाऱ्यांची नियुक्त करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले. लम्पी चर्म रोगाने आजारी जनावरांसाठी त्वरित औषधोपचार करण्यात येऊन रोगाचा इतरत्र फैलाव होऊ नये यासाठी गोठा स्वच्छता, जैवसुरक्षा व विविध निर्जंतुक औषधांची फवारणी करण्याचेही निर्देशही डूडी यांनी दिले.
सध्या जिल्हयात लम्पी चर्म रोगाचा सौम्य प्रादूर्भाव दिसून आला असून उपचारानंतर बहुतांश जनावरे बरी होत आहेत. सर्व शासकीय संस्थांमध्ये लम्पी चर्मरोगावर उपचार करण्यासाठी आवश्यक औषध पुरवठा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतील ५, केद्र पुरस्कृत योजनेतील १ फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे पशुपालकांच्या दारात उपचार करण्यात येत आहे. पशु पालकांनी लम्पी चर्मरोग बाधित पशुधनास उपचार करणेसाठी १९६२ या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंबलबजावणी, बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १००% लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते असे गेल्या दोन वर्षात निदर्शनास आले असून त्यादृष्टीने सर्वांनी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बाधित गाव व बाधित गावालगतच्या ५ किलोमीटर परिसरातील गोवर्गीय पशुधनास प्रतिबंधात्मक लसीकरण गोट पॉक्स लसीद्वारे (उत्तरकाशी स्ट्रेन) करण्यात येते. पुणे जिल्हयामध्ये २० व्या पशुगणनेनुसार ८,४६,७४५ इतके गोवर्गीय पशुधन असुन चालु वर्षी सन २०२५-२६ मध्ये एकूण ५,८०,६०० लस मात्रा वितरित केल्या असून ५,७०,७९१ इतके लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी रोगाचा उद्रेक दिसुन येत आहे व ज्या पशुधनास लसीकरण झालेले नाही, त्यासाठी तालुकानिहाय लस मागणी घेण्यात आली असुन नव्याने लसमात्रा खरेदी करुन पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.
यावेळी बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, जिल्हयातील सर्व सहाय्यक आयुक्त व तालुक्याचे अधिकारी उपस्थित होते.


