Crime News: पुरंदर: मोक्का सह 15 गंभीर गुन्हे दाखल असलेला व 3 गुन्हयात फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद : पुणे ग्रामीण ATS ची कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक २२ जुन रोजी सासवड येथून जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट याप्रमाणे दाखल असलेल्या शिरूर, सासवड, जेजूरी या ३ पोलीस स्टेशनच्या गुन्हयांमध्ये फरार असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेडकर (वय २८ वर्षे) रा. चांबळी ता.पुरंदर, जि.पुणे यास जेरबंद केलेले आहे.
दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी सुरज अनिल जाधव रा.बेलसर ता. पुरंदर यांनी ट्रान्सफॉर्मर बंद केला नाही म्हणून त्यांना आरोपी दिगंबर शेंडकर व त्याचे ३ साथीदार यांनी लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करुन गंभीर दुखापत केली होती. त्यानंतर तो फरार झालेला होता. त्यानंतर दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सोनोरी येथील हॉटेल व्यवसायिक राहूल सुभाष काळे रा.सोनोरी ता. पुरंदर यांचे सोनोरी येथील हॉटेलवर आरोपी दिगंबर शेडकर व त्याचे साथीदार यांनी मालक व कामगार यांना दमदाटी शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करून हॉटेलच्या काउंटर मधील ३२ हजार रुपये जबरदस्तीने नेले होते. तसेच सदर हॉटेल व्यवसायिक यास यापूर्वीही धमकावून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी पोटी घेतले होते. त्यानंतर दिनांक १९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा तालुका शिरूर येथे क्रिकेट ग्राउंडवर बॅनर वरील फोटो लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात फिर्यादी अमोल आनंदा चौगुले रा.मांडवगण फराटा याचेवर आरोपी दिंगबर शेंडकर व त्याचे ६ साथीदार यांनी जीवे मारण्याचे उद्देशाने पिस्तुलमधून फायरींग करून पळून गेले होते. या घटनां बाबत आरोपी दिगंबर शेंडकर याचेवर जेजूरी पोलीस स्टेशनला गंभीर दुखापत, सासवड पोलीस स्टेशनला जबरी चोरी, खंडणी व शिरुर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट याप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सदर गुन्हयांमध्ये तो फरार असल्याने पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके त्याचे मागावर होती. परंतु तो वेशांतर करुन राहण्याची ठिकाणे बदलून राहत असल्याने पोलीसांना गुंगारा देत होता.
दिगंबर उर्फ दिग्या शेंडकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी राजगड, जेजूरी, सासवड व शिरुर पोलीस स्टेशनला खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, आर्म ॲक्ट व मोक्का या सारखे एकूण १५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
दिगंबर शेंडकर हा अवैध अग्नीशस्त्र विक्री करणारे गुन्हेगार यांचे संपर्कात असल्याची माहिती पुणे ग्रामीण एटीएस पथकास मिळाली होती. सदर माहितीप्रमाणे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल यांनी त्याचा शोध घेणेसाठी एटीएस पथकाची नेमणूक केलेली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने त्याची माहिती काढून त्याचेवर पाळत ठेवून वेशांतर करुन त्यास सासवड ता.पुरंदर, जि.पुणे येथून ताब्यात घेतलेले आहे.
सदर आरोपी यास फरार राहणे करिता कोणी कोणी मदत केली? त्याचे संपर्कात कोण होते? याबाबत पोलीसांकडून अधिक तपास चालू आहे.
सदर कामगिरी ही पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल तसेच पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार व बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, विशाल गव्हाणे व पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे यांचे पथकाने केलेली आहे.



