News: जेजुरीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढणार: नगरपालिका व पोलीस प्रशासनाचा निर्णय

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील मुख्य रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे काढण्याचा निर्णय नगरपालिका व पोलीस प्रशासनाने घेतला आहे. तीन दिवसांत नागरिकांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी दरवर्षी सुमारे 60 लाखांहून अधिक भाविक येथे येतात, त्यामुळे गावात सतत भाविकांची वर्दळ असते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खंडोबा गड पायथा, नंदी चौक, चिंचेची बाग ते सातारा नाका या रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी दिवसभर असते. या रस्त्यावर दुकानदारांची असणारी अतिक्रमणे, रस्त्यावर बसणारे विक्रेते यामुळे रस्त्याने चालताना नागरिकांना व भाविकांना कसरत करावी लागते. याच रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहने गडाकडे जातात. त्यांना वाहने चालवणे मुश्किल होते.

स्थानिक नागरिकांनीही मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. येत्या 4 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा जेजुरी मुक्कामी येणार असून, दोन दिवसांत हजारो वारकरी बांधव देवदर्शनासाठी खंडोबा गडावर जातात. त्यांना सहजपणे गडावर जाऊन देवदर्शन घेता यावे, यासाठी मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे पोलीस व पालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात येणार आहेत.
नागरिकांनी ही अतिक्रमणे तीन दिवसांत काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर पोलीस व पालिका प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करून अतिक्रमणे काढण्यात येतील, अशी माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे व पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी दिली.


