Crime News: सहा वर्षीय मुलीच्या अपहरण, खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा; आरोपीच्या आईला सात वर्षांचा कारावास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): मावळ तालुक्यातील (Maval) कोथुर्णे गावात सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारी, दि. 22 रोजी शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर त्याच्या आईला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (रा. कोथुर्णे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे 2 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी (Maval) तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक केली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कामशेत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 117/2022 भादवि 302, 376(2), 376(A), 376(AB), 363,201,34 बालकांचे लैंगिक शोषणांपासून संरक्षण अधिनियम कलम3,4,5,5M,6 हा एक संवेदनशील गुन्हा दिनांक 02/08/2022 रोजी कामशेत पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता.-कामशेत पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कोथुरने गावातील निर्भया (वय 6 वर्ष) तिचे अपहरण व अत्याचार करून खून असा दाखल झाला होता. घटनेबाबत त्यावेळी मावळ तालुका तसेच परिसरातील जनमानसात अत्यंत तीव्र व संतापजन्य प्रतिक्रिया उलटून आंदोलने व मोर्चे काढण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक जगताप व तपास पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए जे दरेकर, पोहवा रॉय व पोलिस अंमलदार आशिष झगडे यांनी पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत कुशलतेपूर्वक करून आरोपीतांचे विरुद्ध जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून गुन्ह्याची सुनावणी द्रुतगती न्यायालयात सुरू करावी याकरिता शासनास पत्र व्यवहार केला होता. त्याप्रमाणे शासनाने नमूद गुन्ह्याची द्रुतगती न्यायालयात सुनावणी सुरू करून आज रोजी नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय 24 वर्ष) यास अपहरण, खून, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या अधिनियमाखाली मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे तसेच सह आरोपी सुजाता महिपती दळवी (वय 48 वर्ष) हिस माननीय न्यायालयाने पुरावा नष्ट करणे या कलमाखाली सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
गुन्ह्याची सुनावणी बी पी क्षीरसागर विशेष न्यायाधीश सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे यांचे कोर्टात झाली. खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून पो. हवा. दिक्षित यांनी काम पाहिले तसेच नमूद खटल्याचे संपूर्ण कामकाज हे सरकारी अभियोकता राजेंद्र कावेडिया यांनी केले आहे.



