News: जेजुरी: विसर्जन मिरवणुकीबाबत गणेश मंडळांना पोलिसांच्या सूचना; अतितीव्र आवाजात डीजे वाजविल्यास संबंधितांवर कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाइन न्युज): गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलिसांनी शहरातील गणेश मंडळांची पुन्हा बैठक घेत विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मंडळांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशी सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मिरवणुकीत शिस्त राखण्याचे आवाहन केले. तसेच अश्लील हावभाव, आक्षेपार्ह प्रकार तसेच अतितीव्र आवाजात डीजे वाजविल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजाचे रीडिंग घेण्यात येणार असून, निर्धारित मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळ किंवा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही पोलिसांनी दिला.
विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावी तसेच पुणे–पंढरपूर मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले.
या बैठकीस जेजुरी शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



