क्राईम

Crime News: तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या; जेजुरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावच्या हद्दीतील रामकाठी शेताच्या शिवारात प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराकडून प्रेयसीच्या नवऱ्याचा वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी संतोष रोहिदास शेंडकर (वय 46, रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक गोरख जगताप (वय 22, रा. राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) हा तरुण दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी घरातून बाहेर पडला होता. 14 डिसेंबर रोजी सकाळी माळशिरस गावच्या हद्दीतील रामकाठी शेताच्या शिवारात त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. मृतदेहावर डोके, मान,पाठ व उजव्या पायावर धारदार शस्त्राने केलेल्या गंभीर जखमा आढळून आल्या.

या घटनेमागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेली सूडभावना कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे; मुळ रा. राहू, ता. दौंड) याची पूर्वीची प्रेयसी हिने दिपक जगताप याच्याशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आरोपीने दिपकचा काटा काढल्याचा आरोप आहे.

लग्नानंतरचे वाद मिटविण्याच्या तसेच पायलचा जुना मोबाईल परत देण्याच्या बहाण्याने आरोपीने दिपकला शेतात बोलावून घेतले. तेथे त्याच्याकडील धारदार लोखंडी कोयत्याने दिपकवर वार करून त्याचा जागीच खून केला. खुनानंतर आरोपीने घटनास्थळी हत्यार टाकून पलायन केले. याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा तपास जेजरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button