आपला जिल्हाआरोग्य

News: जेजुरी जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जेजुरी नगर परिषद महिला व बाल कल्याण समिती व ग्रामीण रुग्णालय जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम मल्हार नाट्यगृह येथे उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला.

या शिबिरामध्ये जेजुरी शहर व परिसरातील मोठ्या संख्येने महिला व युवतींनी सहभाग घेतला. शिबिरामध्ये महिलांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी तसेच स्त्रीरोग विषयक तपासणी करण्यात आली. तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध आजारांबाबत तज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांनी आपल्या आरोग्याकडे नियमित लक्ष देणे, वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि आरोग्याबाबत जागरूक राहून महिलांनी स्वसंरक्षणासाठी हिमतीने पुढे येणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी यावेळी व्यक्त केले.

महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि महिलांना योग्य वेळी वैद्यकीय सल्ला व उपचार मिळावेत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील आरोग्य शिबिरात महिलांना व युवतींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व समुपदेशन डॉ. विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. प्रताप साळवे वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय जेजुरी, डॉ. हेमा देठे स्त्रीरोग तज्ञ व वैद्यकीय अधिकारी, डॉ. अनुराधा बोराडे स्त्रीरोग तज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांनी केले. तसेच मोनाली कदम, पल्लवी गवते, सुरेखा काकडे, निलेश शेजवल व विद्या नगरकर यांनी शिबिरासाठी उपस्थित महिला व युवतींच्या आरोग्यविषयक ECG, BSL-R, SUGAR, CBC, LFT, RFT, ICTC या तपासण्या केल्या तसेच मासूम संस्थेच्या मोनाली म्हेत्रे व ऋषाली कावडे यांनी गर्भाशयाची कॅन्सर पूर्व तपासणी केली. सदरील शिबिराचा लाभ एकूण २२८ महिला व युवतींनी घेतला.

कार्यक्रमास जेजुरी नगरपरिषद महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अमिना पानसरे, उपसभापती प्रज्ञा राऊत, महिला बालकल्याण समिती सदस्या स्नेहल भालेराव, योगिता दोडके, प्रियंका देशमुख, नगरसेविका मंदा बयास, मोनिका घाडगे, मेघा उबाळे, नीलम सातभाई, भक्ती कोरपड, स्वरूपा खोमणे नगरसेवक कृष्णा कुदळे, शिवाजी जगताप, परशुराम लाखे व मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले उपस्थित होते.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत झाली असून महिलांनी अशा उपक्रमांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेजुरी नगर परिषद महिला व बाल कल्याण समिती. ग्रामीण रुग्णालय जेजुरी तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका भक्ती कोरपड यांनी केले व आभार प्रदर्शन नगरसेविका मोनिका घाडगे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button