जेजुरी: ग्रामदेवता जानाईदेवी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला प्रारंभ

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरी ग्राम दैवता व श्रद्धास्थान जाणाई देवी मंदिराची वास्तूशांत, नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला आज पासून सुरुवात झाली आहे. नूतन जाणाई देवीची मूर्ती आठ दिवस विहिरीतील पाण्यात ठेवण्यात आली होती. काल सकाळी ही मूर्ती पाण्यातून काढून देवीला जलाभिषेक, दुग्धभिषेक घालण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजा व धार्मिक उपक्रम करून जाणाई देवीची मूर्ती शहरातील जाणाई मंदिरात आणण्यात आली.

सायंकाळी शहरातून मिरवणूक काढून पाच दिवस धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जाणाई देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त देवसंस्थान चे विश्वस्त आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन जेजुरी ग्रामदैवत सार्वजनिक जाणाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

जानाईदेवी मूर्तीची मिरवणूक
श्रीजानाई देवीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जेजुरी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आकर्षक विद्युतरोषणाई, बँड पथक, पारंपरिक वाद्ये, घोडे, उंट, रथाचा सहभाग होता. या वेळी भाविकांनी गुलाल, भंडार व फुलांची उधळण केली. मिरवणुकी दरम्यान महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढून जानाईदेवीचे औक्षण केले. हजारो ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते.