News: जेजुरीत पौष पोर्णिमेनिमित्त ऐतिहासिक गाढवांचा बाजार

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत पौष पोर्णिमेनिमित्त ऐतिहासिक गाढवांचा बाजार भरतो. यात चार ते पाच कोटींपेक्षा जास्त किंमतची उलाढाल होते. जेजुरीच्या गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल होत असतात.

पौष पौर्णिमेला जेजुरीच्या श्री खंडेरायाची यात्रा असते आणि याच दिवशी गाढवांचा बाजाराचा मुख्य दिवस असतो. जेजुरीत संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश मधून गाढवे विक्रीस येत असतात. दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयापर्यंत भाव या गाढवांना मिळतो.
पौष पौर्णिमेला या यात्रेसाठी राज्यभरातून कोल्हाटी, वैदू, बेलदार, कुंभार, गाडीवडार , मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील हजारो लोक जेजुरीत येत असतात.

बाजारामध्ये गाढवाचे दात, वय पाहून त्याची किंमत ठरविली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड, जवान असे म्हटले जाते.