आपला जिल्हामहाराष्ट्र

News: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार; 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करून स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरीता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकतेसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा निःशुल्क आहे. स्पर्धेचा अर्ज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या https://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून परिपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmil.com या ई-मेलवर ३१ ऑगस्टपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. पुणे जिल्ह्यातून ३ शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी पाठविल्या जातील.

राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button