आपला जिल्हा

News: शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता दिशा कृषी उन्नती अभियान महत्वपूर्ण: जितेंद्र डुडी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यादृष्टीने दिशा कृषी उन्नती अभियान महत्वाचे आहे; अभियान यशस्वी करण्याकरिता गाव पातळीवर शेतकऱ्यांचे गट तयार करा, त्यांना प्रशिक्षित शेतकऱ्यांमधूनच गावातच मास्टर प्रशिक्षक तयार करा, निर्यातदारांची साखळी तयार करुन शेतकऱ्यांना नियातक्षम कृषी उत्पादन घेण्याकरिता कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. धीरज शिंदे, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी आदी उपस्थित होते.

डूडी म्हणाले, जिल्ह्यात ‘दिशा कृषी उन्नतीची- २०२९’ हा आराखडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल/ करडई, डाळींब, सिताफळ आणि द्राक्ष या पिकांचे क्लस्टर करण्यावर भर देण्यात येत आहे. निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीच्यादृष्टीने कृषी विभाग, आत्मा यंत्रणेने कृषितज्ज्ञ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कालबद्ध कार्यक्रम राबवून अधिकाधिक पिकांची निर्यात करण्याचा प्रयत्न आहे. या पीकांना सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पाणी, खते आदींचा कार्यक्षम वापर, कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पादन वाढ, निर्यातसाखळी तयार करुन निर्यातीत वाढ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कामे करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांचे गट तयार करुन त्यांना मास्टर प्रशिक्षक, यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. तालुका मंडळ अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी देवून शेतकऱ्यांशी संवाद साधावा. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडअडचणी सोडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्मिती करावी. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत कृषी विभाग प्रयत्नशील असून याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही डुडी यांनी दिली.

काचोळे म्हणाले, या अभियानाअंतर्गत केळी, आंबा, अंजीर, स्टॉबेरी, द्राक्ष, डाळींब पीकांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. येत्या काळात सूर्यफूल/ करडई, सिताफळ पीकांचे लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याच्यादृष्टीने सुक्ष्म आराखडा तयार करुन कामे करण्यात येईल, याकरिता क्षेत्रनिहाय भेटी देवून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याच्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात येईल, असेही काचोळे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button